कोल्हापूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। महापालिकेच्या फुलेवाडी येथील अग्निशामक दलाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू असताना रात्री मोठी दुर्घटना घडली. दुपारी स्लॅब टाकण्यात आलेला होता. मात्र रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान हा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून सात ते आठ मजूर जखमी झाले आहेत. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी तातडीने या दुर्घटनेच्या चौकशीसाठी अति. आयुक्त रविकांत अडसूळ, आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांची समिती नेमली. यामध्ये घडलेली घटना गंभीर असून या कामासाठी वापरलेले साहित्य आणि कामाचा दर्जा याबाबत तपासणी करून अहवालदेण्याचे आदेश दिले आहेत.
घटनास्थळी जेसीबीसह यंत्रसामग्रीचा वापर करून अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी बचाव कार्यासाठी परिसरातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार ऋतुराज पाटील महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह महानगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मदत व बचाव कार्य सुरू असून घटनास्थळी तातडीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दुर्घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
जखमींना सीपीआर हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या खाण्याची व्यवस्था शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे, कोल्हापूर जिल्हाप्रमुख विनायक जरांडे, उपजिल्हाप्रमुख मनमोहन खोत यांनी घटनास्थळी धाव घेतला. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन लगेचच सीपीआर येथे जाऊन कोल्हापूर जिल्हा आरोग्य उपसंचालक दिलीप माने, महानगरपालिका आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा, जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर यांच्यासह जखमींच्या उपचाराची माहिती घेतली.
साळुंखे यांनी सदर दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनाही दिली. यावेळी साळुंखे यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर देत योग्य ते उपचार मिळत असल्याची खात्री केली. दुर्घटनेनंतर रुग्णांना आणि नातेवाईकांना रुग्णालयात आणल्यानंतर रात्री १ वाजले तरी त्यांनी काहीही खाल्लेले नसलेले लक्षात आल्यानंतर साळुंखे यांनी खाण्याची व्यवस्था करून संवेदनशीलतेचे दर्शन घडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar