जळगाव,, 1 ऑक्टोबर (हिं.स.) कृषि समृद्धी योजनेंतर्गत सन २०२५-२६ पासून शेतकऱ्यांसाठी कृषि यांत्रिकीकरण घटकात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. या अनुषंगाने कृषि विभागाने महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली असून, शेतकऱ्यांना अर्ज एक, योजना अनेक या तत्त्वावर लाभ मिळणार आहे. या प्रणालीद्वारे कृषि यांत्रिकीकरण उप-अभियान, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना यासह ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर चलित औजारे, पिक संरक्षण औजारे, मनुष्यचलित औजारे, स्वयं चलित औजारे, किसान ड्रोन व औजारे बँक इत्यादींचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या गरजेनुसार बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सीएससी केंद्रे, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र अशा विविध माध्यमांतून अर्ज दाखल करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जांची छाननी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार असून, ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती, मोका तपासणी आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप महाडीबीटी पोर्टलवर कृषि यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी तातडीने अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा अधिकक्ष कृषि अधिकारी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर