358 अब्जाधीशांचा नवा विक्रम, शाहरुख खानही क्लबमध्ये सामील
मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले स्थान मिळवले असून त्यांची संपत्ती 9.55 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एम 3 एम आणि हुरुन इंडियाने जाहीर केलेल्या एम3एम हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 च्या 14व्या आवृत्तीनुसार या वर्षी भारतातील अब्जाधीशांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचून 358 झाली आहे. या यादीत गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब 8.15 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
या यादीत पहिल्यांदाच रोशनी नादर मल्होत्रा आणि त्यांचे कुटुंब 2.84 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर पोहोचले असून त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. तसेच टॉप 10 मध्ये स्थान मिळवणाऱ्या सर्वात तरुण सदस्य ठरल्या आहेत. एआय स्टार्टअप परप्लेक्सिटीचे संस्थापक अरविंद श्रीनिवास हे 21,190 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात तरुण अब्जाधीश झाले आहेत, तर नीरज बजाज आणि त्यांचे कुटुंब यांनी 43 टक्के वाढीसह संपत्ती 2.33 लाख कोटींवर नेऊन सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
या यादीत बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांनी पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या क्लबमध्ये प्रवेश केला असून त्यांची संपत्ती अंदाजे 12,490 कोटी इतकी आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी शेअरमधील 124 टक्के वाढीनंतर पुन्हा अब्जाधीशांचा दर्जा मिळवला आहे. तर झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा हे देशातील सर्वात तरुण अब्जाधीश ठरले असून त्यांचे भागीदार आदित पलिचा यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.
भारतभरातील श्रीमंतांपैकी सर्वाधिक नावे मुंबईतील असून यंदा 451 व्यक्तींचा समावेश झाला आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये 223 आणि बेंगळुरूमध्ये 116 श्रीमंतांची नोंद झाली आहे. या वर्षी एकूण 1,687 जणांची यादी जाहीर झाली असून त्यांची संपत्ती 1,000 कोटींपेक्षा जास्त आहे. यात 284 नवीन नावे आहेत. यादीत एकूण 101 महिलांचा समावेश असून त्यापैकी 26 डॉलर अब्जाधीश आहेत आणि विशेष म्हणजे त्यातील 66 टक्के महिला स्वयंनिर्मित आहेत.
क्षेत्रनिहाय पाहता औषध उद्योगात सर्वाधिक म्हणजे 137 श्रीमंत आहेत. त्यानंतर औद्योगिक उत्पादने या क्षेत्रात 132 आणि रसायने व पेट्रोकेमिकल्समध्ये 125 श्रीमंतांची नावे आली आहेत. बायोटेक क्षेत्रानेही चांगली वाढ नोंदवली आहे. रिअल इस्टेट क्षेत्राने आपली ताकद दाखवून दिली असून 99 जणांचा समावेश या क्षेत्रातून झाला आहे. त्यातील 23 जण पहिल्यांदाच या यादीत आले असून या क्षेत्रातून एकूण 8.72 लाख कोटी रुपयांची संपत्ती जोडली गेली आहे.
हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांनी सांगितले की, एम3एम हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 ही केवळ संपत्ती निर्मितीच नव्हे तर देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतिबिंब आहे. भारतातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 167 लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून ही जीडीपीच्या जवळपास अर्धी आहे. देशातील 66 टक्के व्यक्ती स्वयंनिर्मित असून 74 टक्के उद्योजक पहिल्या पिढीतील आहेत.
एकूणच पाहता ही यादी भारतात पारंपारिक उद्योगांसोबतच तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि बायोटेक क्षेत्रात प्रचंड संपत्ती निर्माण होत असल्याचे दर्शवते. यामुळे भारतातील श्रीमंतांची संख्या वेगाने वाढत असून जागतिक पातळीवर एका नवीन भारताची कहाणी लिहिली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule