लातूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि या समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
श्रीमती मानसी यांनी महात्मा गांधी कुष्ठधाम येथे भेट दिली.तेथील कुष्ठरुग्णांसाठी मनपाने घरे बांधून दिलेली आहेत. ही घरे आता मोडकळीस आली असून त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. तेथे भेट देऊन घरांची पाहणी केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शहरातील मोहन नगर येथे मनपाच्या जागेवर नागरिक अनेक वर्षांपासून राहत आहेत. कॉईल नगर येथेही अशीच परिस्थिती आहे.
या नागरिकांना पक्की घरे नाहीत. कबालेही देण्यात आलेले नाहीत. मोहन नगर येथील प्रस्ताव यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेला आहे. तेथील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत श्रीमती मानसी यांनी त्यांना पालिकेच्या वतीने केल्या जात असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
शहरात जयनगर येथे सेफ्टी टॅंकची अस्वच्छता व दुर्गंधी विषयी नागरिकांच्या तक्रारी होत्या.तेथे सेफ्टी टॅंक बांधून देण्यात आलेला होता. तो मोडकळीस आलेला असून दुरुस्ती करणे आवश्यक होते.
त्या परिसराची पाहणी करून आयुक्तांनी तात्काळ संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले. विजयनगर मध्ये पूर्वी बांधून दिलेली घरे मोडकळी आल्याने त्यांची दुरुस्ती करण्यासंदर्भात नागरिकांची मागणी होती.त्याचीही पाहणी केली.
ज्या कारणांसाठी तक्रारी घेऊन नागरिक पालिकेत येत होते अशा ठिकाणांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्यांची तात्काळ सोडवणूक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis