अमरावती, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)घर,दुकान,ऑफिसला तोरण बांधण्यासाठी आवश्यक असलेली झेंडूची फुले विजयादशमीच्या पूर्वसंध्येलाच शहरात विविध ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली. पिवळी, गुलाबी व लाल रंगाची ही फुले बाजारात ७० रुपये प्रती किलो दराने विक्री केली जात होती. मात्र गतवर्षीपेक्षा फुलांना किंमत कमी मिळत होती.जिल्ह्यात सर्वच भागात फुलबागेची लागवड केली जाते.त्यात झेंडूच्या फुलांची लागवड हजारो हेक्टरवर करण्यात आली. यंदा पर्जन्यमान चांगले असल्याने झेंडूच्या फुलांचा बहर चांगलाच आला आहे. गणेशोत्सवापासूनच झेंडूची फुले विक्रीस आली असली तरी या फुलांची विक्री दसरा व दिवाळीला मोठ्या प्रमाणात होत असल्याने अमरावती शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, राजापेठ चौकासह इतर काही महत्त्वाची ठिकाणे व्यापाऱ्यांनी फुले विक्रीसाठी निवडली आहेत यंदा पावसाने अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी झेंडूच्या फुलांचा मुबलक साठा अमरावती शहरात विक्रीस उपलब्ध झाला आहे .
झेंडूच्या फुलांना दसरा सणाला महत्त्व आहे. शेतकरी नियोजन करून झेंडूची लागवड करतात. धामणगाव येथील शेतशिवारात झेंडूच्या फुलांची शेती बहरत आहेत. परंतु मध्यंतरी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे या परिसरातील झेंडू फुलांना फटका बसला त्यातच पावसामुळे काही भागात झेंडूच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
झेंडूच्या फुलांना गुरुवार सकाळपर्यंत भाव राहणार आहे. सकाळी १० नंतर मात्र फुलांचे भाव पडायला सुरुवात होईल. घरी परत नेण्यापेक्षा व फेकून देण्यापेक्षा काही व्यापारी जातानाही नफा कमावण्यासाठी ३० रुपयांपर्यंत फुलांचे भाव पाडतील. कारण दुपारी १२ वाजेनंतर या फुलांकडे कोणीही पाहणारा मिळणार नाही. परिणामी शहरात सायंकाळी चौकाचौकात झेंडूच्या फुलांचा सडा पडलेला दिसेल. ही फुले सध्या गारवा असल्याने टवटवीत दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी