गडचिरोली - मरकणार ग्रामस्थांकडून माओवाद्यांना गावबंदीचा ठराव मंजूर
गडचिरोली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) माओवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या प्रयत्नांना गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश मिळत असून, अतिदुर्गम भामरागड उपविभागातील जनतेने आता माओवाद्यांविरोधात थेट आघाडी उघडली आहे. काल, ३० सप्टेंबर रोजी मरकणार येथील ग्रामस्थांनी ग्रामसभे
मरकणार येथिक ग्रामसभा


गडचिरोली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) माओवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या प्रयत्नांना गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश मिळत असून, अतिदुर्गम भामरागड उपविभागातील जनतेने आता माओवाद्यांविरोधात थेट आघाडी उघडली आहे. काल, ३० सप्टेंबर रोजी मरकणार येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमताने माओवाद्यांना गावबंदीचा ऐतिहासिक ठराव मंजूर केला. इतकेच नव्हे तर, ग्रामस्थांनी एक भरमार बंदूक पोलिसांना सुपूर्द करून विकासाच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचा संदेश दिला आहे.

जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत भामरागड तालुक्यातील एकूण ४० गावांनी माओवाद्यांना गावबंदी करून प्रशासनावरील आपला विश्वास सिद्ध केला आहे.

अबुझमाड जवळच्या गावात क्रांती मरकणार हे गाव गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर, माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ आहे. यापूर्वी गावात माओवाद्यांचे वर्चस्व होते. मात्र, गडचिरोली पोलीस दलामार्फत 'पोलीस दादालोरा खिडकी' आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमुळे नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत झाला आहे. पोलिसांकडून सुरू केलेल्या नागरी कृती उपक्रमांमुळे आणि १६ जुलै २०२५ रोजी सुरू झालेल्या मरकणार ते अहेरी बससेवेमुळे विकासाची चाहूल लागल्याने जनतेने दहशत झुगारून दिली आहे.

अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक यांना मरकणार येथील ७० ते ७५ ग्रामस्थांनी गावबंदीचा ठराव सुपूर्द केला. यावेळी ग्रामस्थांनी माओवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत जेवण, राशन किंवा पाणी देणार नाही, तसेच त्यांच्या संघटनेत सामील होणार नाही आणि गावातील जंगल परिसरात थांबू देणार नाही, असे ठोस आश्वासन दिले.यावेळी श्री. सत्य साई कार्तिक यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि गडचिरोली पोलीस दल सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही दिली.

पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. सत्य साई कार्तिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांनी ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण केली.पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी ठराव करणाऱ्या गावकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांनी अबुझमाड परिसरातील इतर गावातील नागरिकांना माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता, विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आणि गडचिरोली जिल्ह्याला माओवाद मुक्त करण्यासाठी प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande