नाशिक, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। महिला बचतगटांकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या मदतीने कचरा व्यवस्थापन व सेंद्रिय खत निर्मिती उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्या सहकार्याने नाशिक महापालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले असून या उपक्रमांतर्गत नाशिक मनपाला सहा इलेक्ट्रिक कचरा वाहक वाहने उपलब्ध झाली असून त्या वाहनांचा वापर महिला बचतगट, वस्तीस्तर संघ यांच्यामार्फत मंदिरांमधून निर्माल्य संकलन, त्याची प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मिती आणि विक्री यासाठी केला जाणार आहे. यामुळे शहरातील कचऱ्याचे शून्य उत्सर्जन साध्य होऊन पर्यावरणपूरक व्यवस्थापनास चालना मिळणार आहे तसेच महिला बचतगटांना आर्थिक हातभार लागणार आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या हस्ते सहा महिला बचतगटांना या इलेक्ट्रिक वाहनांचे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी उपायुक्त सुवर्णा दखणे, अजित निकत आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV