नांदेड, 1 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगफुटी सदृश अतिवृष्टी पाऊस सुरू असून या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला. हे नुकसान पाहून सहन न झाल्याने एका शेतकऱ्याने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वृद्ध पित्याने ही घटना त्याच्या कानी पडताच अवघ्या 12 तासातच आपले प्राण सोडले.
जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात ही घटना घडली. निवृती कदम आणि सखाराम कदम अस पिता पुत्राचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे.
मयत शेतकरी निवृती (बबन) कदम हे वडिलांचा आजार, शेतातील नापिकी, अतिवृष्टीचे नैसर्गिक संकट यामुळे खचलेल्या निवृती कदम यांनी मृत्यू पुर्वी ' मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीची मदत मिळत नसून सरकारचे शेतकऱ्यांना मातीमोल करण्याचे धोरण ' अशी चिठ्ठी लिहून ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांचे वडील सखाराम कदम हे मागील अनेक वर्षांपासून अर्धांगवायू आजाराने पिडीत असून ते अंथरुणावर पडून होते. अवघ्या 12 तासातच वडील सखाराम कदम (वय -80) यांनाही मुलाच्या घटनेची वार्ता कानी पडताच आपले प्राण सोडले. त्यांच्या पार्थिवावर आज कोंढा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अर्धापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis