नांदेड, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.
या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी.
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis