अहिंसा : भारतीय तत्त्वज्ञानाची मानवतेला दिलेली शाश्वत देणगी
मानवजातीच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहिला तर त्यात वैचारिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय अशा विविध प्रवाहांची सतत धारा वाहताना दिसते. या प्रवाहांनी मानवाला कधी संघर्ष दिला, कधी विकासाची संधी दिली, तर कधी त्याला अधःपतनाच्या मार्गावर नेले. परंतु या साऱ
अहिंसा परमो धर्मः


मानवजातीच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहिला तर त्यात वैचारिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय अशा विविध प्रवाहांची सतत धारा वाहताना दिसते. या प्रवाहांनी मानवाला कधी संघर्ष दिला, कधी विकासाची संधी दिली, तर कधी त्याला अधःपतनाच्या मार्गावर नेले. परंतु या साऱ्या गोंधळातही काही शाश्वत मूल्ये अशी आहेत की त्यांनी मानवतेला टिकवून ठेवले, जीवनाला अर्थ दिला आणि समाजाला योग्य दिशा दिली. या मूल्यांमध्ये अहिंसा हे भारतीय तत्त्वज्ञानाचे जगाला आणि मानवतेला दिलेली सर्वांत मोठी शाश्वत देणगी आहे. हिंसेच्या आगीमध्ये जळणाऱ्या मानवतेला अहिंसा हा शीतल झरा आहे. म्हणूनच २ ऑक्टोबर हा दिवस, जो महात्मा गांधींच्या जन्मदिनानिमित्त ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो, तो केवळ गांधीजींच्या स्मृतीपुरता मर्यादित नसून भारतीय विचारसंपदेच्या गौरवाचे प्रतीक आहे.

अहिंसेची कल्पना भारतात नवी नाही. ‘अहिंसा परमो धर्मः’ हा विचार लोकांच्या आचार-विचारात रूजलेला होता. पण अहिंसेला सर्वाधिक सुस्पष्ट रूप आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनविले ते बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाने. या दोन परंपरांनी अहिंसेला केवळ धार्मिक उपदेश न ठेवता ती सामाजिक, नैतिक आणि वैयक्तिक जीवनाच्या प्रत्येक पातळीवर आचरणात आणली आहे. भगवान बुद्धांनी करुणा, मैत्रीभावना आणि समत्व यांच्या माध्यमातून अहिंसेला मानवी जीवनाचा पाया बनविला, तर भगवान महावीरांनी अहिंसेला सर्वोच्च व्रत मानले. त्यामुळे भारताची ही देणगी केवळ एका देशापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिने संपूर्ण जगाच्या वैचारिक इतिहासाला घडविले.

भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीत अहिंसेला करुणा आणि मैत्रीभावनेच्या माध्यमातून केंद्रस्थानी ठेवण्यात आले. बुद्धांनी मानवी जीवनातील दु:खाचे मूळ अज्ञान, लोभ आणि द्वेषात शोधले. त्यांनी सांगितले की प्रत्येक जीव दु:ख टाळण्याची इच्छा करतो; त्यामुळे कोणत्याही जीवाला दु:ख देणे ही सर्वांत मोठी हिंसा आहे. बुद्धांच्या पंचशीलांमध्ये पहिला नियम किंवा शील आहे ते म्हणजे ‘प्राण्यांचा जीव घेणार नाही’. हा नियम केवळ हत्या न करण्यापुरता मर्यादित नाही, तर इतरांना त्रास देणार नाही, शोषण करणार नाही, दास्य स्वीकारणार नाही, असेही त्याचे व्यापक स्वरूप आहे.

बुद्धांच्या अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टी, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका ही सर्व अंग अहिंसेशी थेट जोडलेली आहेत. खोटे बोलणे, कटु वाणी वापरणे, परनिंदा करणे, लोभ, मत्सर, क्रोध या सर्व मानसिक हिंसा आहेत. त्यामुळे बुद्धांनी मन, वाणी आणि कृती या तिन्ही स्तरांवर करुणा आणि मैत्री विकसित करण्यावर भर दिला. बौद्ध परंपरेतील ‘मैत्रीभावना ध्यान’ म्हणजे अहिंसेचेच एक सुंदर व्यावहारिक रूप आहे. या ध्यानात साधक स्वतःसाठी आणि सर्व प्राणिमात्रांसाठी शुभेच्छा व्यक्त करतो ‘सर्व प्राणी सुखी होवोत, सर्व प्राणी निरोगी राहोत, सर्व प्राणी शांततेत नांदोत’. या प्रक्रियेतून मनातील द्वेष, राग, मत्सर नाहीसे होऊन करुणा, प्रेम आणि सहजीवनभाव निर्माण होतो.

बुद्धांच्या शिकवणीचा समाजावर फार मोठा परिणाम झाला. त्याकाळी प्रचलित असलेल्या प्राण्यांच्या बलिदानांच्या प्रथा, जातीभेद, दास्यप्रथा यावर मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आशियातील चीन, जपान, श्रीलंका, थायलंड, कोरिया या देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला आणि त्यासोबतच अहिंसेचा विचारही सर्वत्र रुजला. त्यामुळे अहिंसा ही केवळ भारतीय मूल्य न राहता संपूर्ण आशियाई संस्कृतीचा आधारस्तंभ ठरली.

तसेच जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी अहिंसेला जीवनाचा केंद्रबिंदू मानला. त्यांच्या मते प्रत्येक जीवामध्ये आत्मा आहे आणि प्रत्येक आत्मा शुद्ध, शाश्वत व समान आहे. त्यामुळे कोणत्याही जीवाला दुखविणे म्हणजे स्वतःच्या आत्म्यावरच आघात करणे होय. महावीरांनी पाच महान व्रते सांगितली – अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. यामध्ये अहिंसा हे सर्वोच्च व्रत मानले जाते, कारण त्याशिवाय इतर व्रतांचे अस्तित्वच अशक्य आहे. जैन आचारसंहितेनुसार अहिंसा केवळ हत्या टाळणे एवढीच मर्यादित नाही, तर ती विचार, वाणी आणि कृती या तिन्ही स्तरांवर आचरली जाणारी संपूर्ण जीवनपद्धती आहे.

जैन साधू-साध्वींनी आचरलेली अहिंसा इतकी सूक्ष्म आहे की ती पाहून जग थक्क होते. चालताना एखादा कीटक चिरडला जाणार नाही याची दक्षता घेणे, पाणी गाळून पिणे, रात्री न चालणे, जमिनीवर बसताना सूक्ष्म जीवांना इजा होणार नाही यासाठी पायाखाली कापड पसरवणे ही त्यांच्या जीवनातील वास्तव उदाहरणे आहेत. इतकेच नव्हे तर ते वाणीतील कटुता, विचारांतील वैरभाव यांनाही हिंसा मानतात. गृहस्थांसाठीही महावीरांनी अहिंसेचा उपदेश केला. जाणूनबुजून कोणत्याही सजीवाला त्रास न देणे, व्यापारात फसवणूक न करणे, इतरांच्या संपत्तीवर डोळा न ठेवणे, कुटुंबात संयम व करुणा पाळणे ही गृहस्थांची अहिंसा ठरते.

जैन तत्त्वज्ञानाद्वारे अहिंसेच्या वैचारिक विस्ताराचे दर्शन घडवतात. सत्य एकांगी नसते; ते विविध दृष्टीकोनांतून समजावे लागते. त्यामुळे इतरांचा विचार नाकारणे, त्यांना चुकीचे ठरविणे, आपलेच सत्य अंतिम मानणे ही एक प्रकारची मानसिक हिंसा ठरते. तसेच प्रत्येक विधान सापेक्ष आहे, ते ‘अमुकदृष्ट्या सत्य’ असते. त्यामुळे वादविवादात अडेलतट्टूपणा टाळून संवाद साधणे, परस्पर सहिष्णुता बाळगणे हेही अहिंसेचेच रूप आहे. अशा प्रकारे जैन परंपरेने अहिंसेला जीवनाच्या प्रत्येक अंगात विस्तार दिला.

या दीर्घ परंपरेला आधुनिक काळात नवे परिमाण दिले ते महात्मा गांधींनी. गांधीजींनी अहिंसेला केवळ वैयक्तिक चारित्र्याची गोष्ट न मानता सामाजिक व राजकीय संघर्षाचे प्रभावी साधन बनवले. त्यांनी सांगितले की सत्यासाठी लढताना अहिंसा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढताना महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाच्या माध्यमातून अहिंसेचा उपयोग केला. त्यांनी दाखवून दिले की शस्त्र न उचलता देखील साम्राज्याला गुडघे टेकवता येतात. महात्मा गांधीजींच्या या प्रयोगाने जगातील अनेक नेत्यांना प्रेरणा दिली. मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला, दलाई लामा यांसारख्या नेत्यांनी अहिंसेच्या मार्गाने सामाजिक परिवर्तन घडवून आणले. संयुक्त राष्ट्रसंघाने महात्मा गांधीजींच्या जन्मदिनी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी, ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ घोषित करून या भारतीय विचारधारेचे जागतिक महत्त्व अधोरेखित केले.

आजच्या युगात अहिंसेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाला अवकाशाचा वेध घेता आला, संगणक व कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करता आली, पण त्याचबरोबर युद्ध, दहशतवाद, अण्वस्त्रांची शर्यत, पर्यावरणाचा ऱ्हास, सामाजिक असमानता यांसारख्या समस्या अधिकच तीव्र झाल्या. मानवी लोभामुळे पृथ्वीचे संतुलन धोक्यात आले आहे. हिंसा केवळ रणांगणावर नव्हे तर विचारांमध्ये, वाणीमध्ये आणि समाजरचनेतही वाढताना दिसते. अशा वेळी प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाची देणगी असलेली अहिंसा हीच मानवतेचा खरा आधार ठरते. अहिंसा म्हणजे केवळ युद्ध टाळणे नाही, तर अहिंसा म्हणजे पर्यावरणाचा विध्वंस न करणे, प्राण्यांवर अनावश्यक अत्याचार न करणे, महिलांवर व दुर्बलांवर होणारी हिंसा थांबवणे, जातीय, धार्मिक वा वांशिक भेदभाव दूर करणे, सामाजिक व आर्थिक अन्यायाला अहिंसात्मक मार्गाने आव्हान देणे. जर प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनात विचार, वाणी आणि कृती या तिन्ही स्तरांवर अहिंसा पाळली, तर समाजात शांतता, प्रेम व सहजीवनाचे वातावरण निर्माण होईल.

अहिंसा ही केवळ उपदेशाची गोष्ट न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरली पाहिजे. बौद्ध आणि जैन परंपरांनी दिलेली करुणा व मैत्रीभावना, गांधीजींनी दिलेला सत्याग्रहाचा मार्ग आणि संयुक्त राष्ट्रसंघाने अहिंसेला दिलेली जागतिक मान्यता या सर्व गोष्टी आपल्याला आठवण करून देतात की अहिंसा हीच भविष्यातील मानवतेची तारणहार आहे. हिंसा विध्वंस घडवते, तर अहिंसा सृजन करते. हिंसा द्वेष वाढवते, तर अहिंसा मैत्री निर्माण करते. हिंसा मृत्यू पसरवते, तर अहिंसा जीवनाचा उत्सव साजरा करते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त आपण सर्वांनी हे स्मरण केले पाहिजे की, जर मानवतेचे भविष्य सुरक्षित, उज्ज्वल आणि शांततामय करायचे असेल, तर अहिंसा हीच जीवनपद्धती म्हणून स्वीकारावी लागेल. हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे कर्तव्य आहे. अहिंसा ही भारतीय तत्त्वज्ञानाची मानवतेला दिलेली शाश्वत देणगी आहे आणि हीच देणगी आपल्याला उज्ज्वल उद्याच्या दिशेने नेणारी आहे.

- डॉ. राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)

संपर्क - ९९६०१०३५८२, bagate.rajendra5@gmail.com

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande