- विशेष टपाल तिकीट संघ स्वयंसेवकांच्या समर्पणाचे प्रतिबिंब
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली शताब्दी वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, बुधवारी विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे लोकार्पण केले. यावेळी पंतप्रधानांनी संघ कार्याचे आणि योगदानाचे मनापासून कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषणात संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. हे नाणे आणि टपाल तिकीट आरएसएसच्या १०० वर्षांच्या इतिहासाचा आणि योगदानाचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून कायम स्मरणात राहतील, असेही ते म्हणाले. नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर संघाला चिरडण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु संघ या सर्व आघातांना तोंड देत वटवृक्षासारखा खंबीरपणे उभा राहिला. या प्रयत्नांवर मात करून संघाने आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. संघाने आपल्या स्थापनेपासूनच सातत्याने राष्ट्र उभारणीवर लक्ष केंद्रित केले आहे. संघाचे हे कार्य समाजासाठी एक प्रेरणास्रोत राहिले आहे. आरएसएसचा हा गौरवशाली प्रवास म्हणजे त्याग, नि:स्वार्थ सेवा, राष्ट्र उभारणी आणि शिस्तीचे एक असाधारण उदाहरण आहे. स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांना संघाचे शताब्दी वर्ष पाहण्याचे भाग्य लाभले आहे. संघाच्या कार्यात सामील असलेल्या आणि निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे पंतप्रधानांनी आभार मानले.
संघाची स्थापना होणे हा योगायोग नव्हता
१०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होणे हा योगायोग नव्हता, तर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचे हे पुनरुज्जीवन होते. राष्ट्रीय चेतना वेळोवेळी नवीन अवतारांमध्ये युगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रकट होते आणि या युगात, संघ हा त्या शाश्वत राष्ट्रीय चेतनेचा सद्गुणी अवतार आहे. प्रत्येक स्वयंसेवक अस्पृश्यतेविरुद्ध लढला. आरएसएसच्या विचारसरणीत, कोणताही हिंदू लहान किंवा मोठा नसतो. संघाने नेहमीच सामाजिक समरसतेसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. आरएसएसने 'एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशानभूमीची' संकल्पना मांडली. याचा अर्थ समाजात कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांसाठी समान व्यवस्था असावी, या तत्त्वावर संघाने काम केले आहे. प्रत्येक स्वयंसेवक भेदभावाविरुद्ध लढत आहे. देशावर आलेल्या प्रत्येक आपत्तीनंतर स्वयंसेवक पुढे आले आणि त्यांनी मदतीचा हात दिला, याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. विशेषतः कोविड-१९ साथीच्या काळात स्वयंसेवकांनी केलेल्या मदतीचा त्यांनी उल्लेख केला.
पंतप्रधान मोदींनी संघाच्या योगदानाची आठवण करून देताना म्हटले की, १९६३ मध्ये संघ स्वयंसेवकांनी २६ जानेवारीच्या परेडमध्येही मोठ्या अभिमानाने आणि सन्मानाने सहभाग घेतला होता आणि देशभक्तीच्या तालावर कूच केली होती. आज लोकार्पण झालेले विशेष टपाल तिकीट हे केवळ संघाचे नव्हे, तर राष्ट्रसेवा करणाऱ्या आणि समाजाला सक्षम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या समर्पणाचे प्रतिबिंब आहे. त्यांनी या स्मारक नाण्यांसाठी आणि टपाल तिकिटांसाठी सर्व देशवासियांचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत सरकारने जारी केलेल्या विशेष नाण्याची माहिती दिली.
संघाच्या शताब्दी वर्षाचा असा महान प्रसंग आपण पाहत आहोत, हे आपल्या पिढीतील स्वयंसेवकांचे भाग्य आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रसेवेसाठी समर्पित असलेल्या करोडो स्वयंसेवकांना शुभेच्छा आणि अभिनंदन दिले. तसेच, त्यांनी संघाचे संस्थापक आणि प्रेरणास्रोत असलेले परमपूज्य डॉ. हेडगेवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या चरणी आपली श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. हेडगेवार यांनी घालून दिलेल्या आदर्श आणि मूल्यांमुळेच संघाचा प्रवास १०० वर्षांचा झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.
टपाल तिकीट आणि नाण्याचे वैशिष्ट्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी सरकारने जारी केलेले विशेष टपाल तिकीट आणि नाणे का खास आहेत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले की, जारी करण्यात आलेल्या ₹१०० (शंभर रुपयांच्या) नाण्यावर एका बाजूला राष्ट्रीय चिन्ह (National Emblem) आहे. दुसऱ्या बाजूला सिंह (Lion) आणि त्याच्यासोबत स्वयंसेवक भक्तीने नतमस्तक होत असलेली 'भारत मातेची' (Bharat Mata) प्रतिमा आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की, स्वतंत्र भारताच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच भारत मातेची प्रतिमा भारतीय चलनावरील नाण्यावर आलेली आहे. हेच या नाण्याचे सर्वात मोठे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. तसेच आज जारी केलेले विशेष टपाल तिकीट देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे महत्त्व सांगितले आणि एका ऐतिहासिक क्षणाची आठवण करून दिली.
ऐतिहासिक संबंध : १९६३ मध्ये, २६ जानेवारी रोजी स्वयंसेवकांनी राष्ट्रीय परेडमध्ये भाग घेतला आणि देशभक्तीच्या सुरांवर मोठ्या अभिमानाने कूच केली होती. हे टपाल तिकीट त्याच ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करते आणि त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवकांनी राष्ट्राप्रती दाखवलेल्या समर्पणाचे देखील प्रतिबिंबित करते. या महत्त्वपूर्ण भेटीबद्दल देशवासियांचे अभिनंदन करत मोदींनी संघाच्या योगदानाला सलाम केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी