परभणी, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। पालम तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दयनीय स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष पांडुरंग रोकडे यांच्या नेतृत्वाखाली पालम तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.
या संदर्भात भाजपा माजी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे यांनी पालम-पूर्णा तालुक्यातील विविध भागांचा दौरा करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. बनवत सर्कल, चाटोरी सर्कल, राव राजुर सर्कल, पालम शहर, पेठ शिवणी सर्कल येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांना जगण्यासाठी तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून निवेदन सादर करण्यात आले.
पालम शहरातील चौद शहावली दर्गा परिसर, खंडोबा मंदिर ते मारुती मंदिर मार्ग, चर्मकार गल्ली, टेक गल्ली या भागांमध्ये नदीच्या पुराच्या पाण्याने अक्षरशः थैमान घातले. या भागातील घरांमध्ये दोन दिवस पाणी साचून राहिल्यामुळे घरगुती वस्तूंचे व घरांचे अतोनात नुकसान झाले. बाधित कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले होते. या कुटुंबांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यामध्ये भाजपा उपजिल्हाध्यक्ष गोपीनाथराव तुडमे, तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन लाडगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष व प्रदेश कार्यकारी सदस्य लक्ष्मणराव रोकडे, शहराध्यक्ष पांडुरंग रोकडे तात्या, नंदकिशोर बल्लारे अप्पा, मुंजाभाऊ रोकडे, माजी सभापती अच्युत पाथरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis