- शशिकांत शिंदे, सुनील तटकरे अनभिज्ञ
मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात मुंबईत भेट झाल्याची माहिती आहे.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रश्नावर संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पवार काका-पुतण्याची भेट झाली आहे. तब्बल तासभर दोघांमध्ये बैठक झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, काकांची भेट घेण्यासाठी अजित पवार थेट वाय.बी. चव्हाण सेंटरवर गेले होते. या बैठकीतला तपशील अजून बाहेर आला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आतापर्यंत अनेकदा भेटीगाठी झाल्या आहेत. अलीकडेच जानेवारी महिन्यात शरद पवार आणि अजित पवार बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार काका-पुतणे एकत्र आले होते. यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, त्याच मंच्यावर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातही संवाद झाला होता. दोघींच्या खुर्च्या एकमेकांशेजारी होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. अजित पवारांनी घाईघाईने शरद पवारांच्या दालनात प्रवेश केला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली होती. अजित पवार आणि शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये १५ ते २० मिनिटं चर्चा झाली होती.
भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, शरद पवार हे माळेगावचं शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. तिथल्या सभासदांनी मागेच त्यांना अध्यक्ष केलं आहे. तिथे जी बॉडी आहे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन हा त्या बॉडीवर व्हाईस चेअरमन म्हणून येतो. अशी त्याची घटना आहे. त्यामुळे ते इलेक्शन झाल्यानंतर त्याबद्दलची जी बैठक होती त्यासाठी मी आलो होतो. ती बैठक झाली. विश्वस्त मंडळ नेमायचं असतं. तो अधिकार अध्यक्षांनाच असतो. आमचे सहा गट आहेत. त्यातील प्रत्येकी एक प्रतिनिधी घ्यायचा असतो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभा चाललेल्या आहेत. त्या सर्वसाधरण सभेची तारीख आणि वेळ ठरवायची होती. किती अॅडमिशन झाले याबाबत बैठक होती, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं, या भेटीबाबत मला कल्पना नाही. राज्यात जेव्हा जेव्हा समस्या किंवा अडचणी निर्माण होतात, तेव्हा अनुभवी नेते म्हणून शरद पवारांचा सल्ला घेणे ही सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल तर त्यांचं स्वागतच आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. ही भेट झाली असेल तर जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या संदर्भात असू शकते. वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्या प्रश्नांबाबत भेट असू शकते. ही काय राजकीय भेट नाही. राज्याच्या हिताच्या दृष्टीने किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये शरद पवार आणि अजित पवार सुद्धा आहेत, त्या संस्थांच्या संबंधित काही चर्चा असू शकते. मात्र, या भेटीतून राजकीय अर्थ काढण्याचं काहीही कारण नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी