पुणे, 01 ऑक्टोबर (हिं.स.)। चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी पुन्हा एकदा भूमकर चौक ते भुजबळ चौक परिसरात ऑन ग्राऊंड पाहणी करून कामांना वेग देण्याचे आदेश दिले. त्यांच्या सततच्या पाठपुरावामुळे भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून थोड्याफार प्रमाणावर दिलासा मिळाला आहे रस्त्याची कामे अतिक्रमणे रस्त्यावरील खड्डे बुजवणे सर्विस लाईन शिफ्ट करणे इत्यादी कामांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास हातभार लागला आहे सदर परिसरातील उर्वरित ५०%उर्वरित कामांनाही फास्ट ट्रॅकवर घेण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून पूर्ण दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून वाकड-भूमकर चौक परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. या संदर्भात आमदार शंकर जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC), महावितरण, वाहतूक पोलीस, आरटीओ ,यांसह विविध शासकीय यंत्रणांशी सतत समन्वय साधून उपाययोजना राबवल्या. या पाठपुराव्याला आता ठोस परिणाम दिसू लागले आहेत. वीज कंपनीचे डीपी व ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करणे, रस्त्यांची आखणी, खड्डे बुजविणे, अतिक्रमण हटविणे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यातील सर्व्हिस रोडवर प्रत्यक्ष काम सुरू करणे अशा अनेक महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु