अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या पवित्र दिवशी लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली. हा दिवस बौद्ध अनुयायांसाठी श्रद्धा, प्रेरणा आणि आत्मसन्मानाचा दिवस असून दरवर्षी देशभरातील अनुयायी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी जातात.या अनुयायांच्या सेवेसाठी प्रज्ञा स्पर्श बहुउद्देशीय संस्था, नांदगाव पेठ यांच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी टोल नाका, नांदगाव पेठ येथे भोजनदान व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दीक्षाभूमीकडे प्रस्थान करणाऱ्या अनुयायांना भोजन व आरोग्य तपासणीची सुविधा या उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सलग चौदा वर्षांपासून प्रज्ञा स्पर्श बहुउद्देशीय संस्था अनुयायांसाठी निस्वार्थ भावनेने हा उपक्रम राबवत असते.नांदगाव पेठ मधील अनुयायी तसेच प्रज्ञा स्पर्श बहुउद्देशीय संस्था नित्यनेमाने हा उपक्रम राबवत असून दरवर्षी हजारो अनुयायी या उपक्रमाचा अवश्य लाभ घेतात. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने सुमित कांबळे, मंगेश तायडे, कैलास मोरे, अर्जुन युवनाते, मनोज गडलिंग, धीरज गवई, सचिन कांबळे, अंकुश बनसोडे , शंकर बसले, दिनेश खडसे व मनीष गूळदे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी