सिंहस्थाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी
मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.)आगामी कुंभमेळा, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजपाच्या तिनही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात एकत्रित भेट घेतली. शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील श
सिंहस्थाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद करा


मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.)आगामी कुंभमेळा, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजपाच्या तिनही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात एकत्रित भेट घेतली. शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, सिंहस्थाची कामे देताना स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य द्यावे या मुद्दयांवर चर्चा होवून सिंहस्थाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद करून लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची आग्रही मागणी तिघा आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे कधी नव्हे इतके नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.शहरात रोजच घडणाऱ्या हाणामाऱ्या, खून, लुटमार, वाहनांची तोडफोड या गंभीर गुन्ह्यांमुळे शहरवासियांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या परिस्थिती संदर्भात नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत सीमा हिरे, अँड. राहूल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे या भाजपच्या तिघा आमदारांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तिनही आमदार आणि मुख्यमंत्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.

सिंहस्थासाठी करावयाच्या विकासकामांवर चर्चा झाली. सिंहस्थासाठीच्या दुसऱ्या टप्प्यात करावयाच्या कामांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देवून निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी तिघा आमदारांनी बैठकीच्या सुरूवातीस मुख्यमंत्र्यांकडे केली. पावसामुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था दूर करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरीव आर्थिक मदत द्यावी, याबरोबरच शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी मनुष्यबळात वाढ करून गुन्हेगारांच्या विरोधात ठोस अॅक्शन घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे तिनही आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रस्तावित नाशिक पुणे रेल्वेमार्ग व्हाया शिर्डी न नेता पुणे संगमनेर-नाशिक असाच असावा, अशी आग्रही मागणी तिघा आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

भाजपाचे या तीनही आमदारांनी नाशिक जिल्ह्याबाहेरील एक आमदार नाशिकच्या प्रशासकीय कारभारामध्ये हस्तक्षेप करीत आहे त्यामुळे विकास कामांवर देखील परिणाम झाल्याची तक्रार केली आहे या आमदाराला पक्षाच्याच काही मंत्र्यांचे पाठबळ असल्याचे देखील यावेळी या तीनही आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले असून हा हस्तक्षेप करणारा खानदेशातील आमदार हा भाजपचाच आहे पण त्याच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक ठेकेदाराला काम मिळत नाही. इतर कामांना खिळ बसत असल्याची तक्रार देखील या आमदारांनी केली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande