पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।
पुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला २०२५ च्या विजयादशमीला (२ ऑक्टोबर) १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी वर्षाच्या शुभारंभाचे औचित्य साधून पुणे महानगरात संघ शक्तीचे विराट दर्शन घडणार आहे. पुणे महानगरातील स्वयंसेवकांनी विजयादशमी उत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमांची योजना आखली आहे.
पुणे महानगरातील ९ भागांमध्ये एकूण ८४ शस्त्रपूजन उत्सव आयोजित करण्यात आले आहेत. संघ स्वयंसेवकांची एकूण ७७ सघोष पथ संचलने पुणे शहराच्या विविध भागांतून काढली जातील. या उत्सवांमध्ये बाल वयोगटातील स्वयंसेवकांचा सहभाग लक्षणीय असून, त्यांच्यासाठी २० संचलने आणि २७ शस्त्रपूजन उत्सवांचाही समावेश आहे. बाल गटाचे हे उत्सव आठवडाभरात पार पडतील. यंदा संघाने पथसंचलनासोबतच शस्त्रपूजन उत्सवांवर अधिक भर दिला आहे. या उत्सवांमध्ये जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत कार्यरत असलेले संघ स्वयंसेवक सहभागी होत आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या उत्सवांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे, ज्यामुळे संघाचे कार्य समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचेल. शताब्दी वर्षानिमित्त मोठा समाजघटन संघाशी जोडला जात आहे.
- संघ शताब्दीनिमित्त मुख्य उद्दिष्टे
शताब्दी वर्षादरम्यान संघ 'पंच परिवर्तन अभियान' राबविणार आहे. ज्यात पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, स्व-आधारित व्यवस्था, कुटुंब प्रबोधन आणि नागरिक कर्तव्य या पाच बिंदूंना घेऊन संघ समाजात जाणार आहे. तसेच, देशभरातील प्रत्येक मंडळ आणि वस्तीपर्यंत पोहोचून सध्याच्या ६८,००० हून अधिक असलेल्या शाखांची संख्या १ लाख पर्यंत वाढवण्याचे संघाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक गावात संघ स्वयंसेवक गृह संवाद अभियान राबवित राष्ट्रीय विचार आणि संघाची भूमिका पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच सामाजिक समरसतेसाठी सर्व मंडळे आणि वस्त्यांमध्ये हिंदू संमेलने आयोजित केली जातील. यात कोणताही भेदभाव न करता राष्ट्रीय विकास आणि 'पंच परिवर्तन' मध्ये प्रत्येकाचा सहभाग असण्याचा संदेश दिला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु