पुणे जिल्हा परिषदेची जालिंदरनगर शाळा जागतिक क्रमवारीत प्रथम - दादाजी भुसे
मुंबई, 1 ऑक्टोबर,(हिं.स.)। - भारतीय शाळा जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हे जागतिक पातळीवर भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्यता मिळण्यासारखे आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हा क्षण देश आणि राज्याच्या शासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी कलाटणी देण
दादाजी भुसे


मुंबई, 1 ऑक्टोबर,(हिं.स.)। - भारतीय शाळा जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हे जागतिक पातळीवर भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्यता मिळण्यासारखे आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हा क्षण देश आणि राज्याच्या शासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी कलाटणी देणारा क्षण आहे, असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काढले.

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा, एज्युकेशन या इंग्लंड येथे मुख्यालय असणाऱ्या जागतिक संस्थेने आयोजित केलेल्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन’ स्पर्धेमध्ये जगभरातील समुदायाने पसंती क्रमानुसार केलेल्या मतदानानुसार सर्वाधिक मते मिळवून ‘कम्युनिटी चॉइस ॲवॉर्ड’ या मानाच्या विभागात सर्वोत्कृष्ट ठरली. लोकसहभागातून विकसित जिल्हा परिषदेची ही शाळा आहे. या शाळेला एक कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री दादाजी भुसे यांनी आज मालेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री दादाजी भुसे यांनी या शाळेतील शिक्षक दत्तात्रय वारे यांच्यासह मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, व्यवस्थापन समिती, विद्यार्थी व ग्रामस्थांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. ते म्हणाले, आपण केवळ एका शाळेला जिंकवण्यासाठी प्रयत्न केला नसून संपूर्ण शासकीय शाळा व भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्य व सक्षम करण्याचे काम केले आहे. आपल्याला समाजाचे आणि देशाचे गतवैभव परत आणायचे असेल, तर भारतातील एका शासकीय शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी हे घडणे गरजेचे होते. त्यासाठी आपण सर्वांनी आपले कर्तव्य समजून या चळवळीचे नेतृत्व केले व एका भारतीय व शासकीय शाळेला जगात सर्वोत्तम बनवले.

विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जालिंदरनगर शाळेचे उपक्रम शिक्षण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, जालिंदरनगर शाळा ही एकमेव भारतीय व जिल्हा परिषदेची शासकीय शाळा असून लोकसहभागातून विकास करत शाळेने अव्वल स्थान मिळविले आहे. प्रगत देशातील व खासगी क्षेत्रातील लाखो शाळांना मागे सोडून सरकारी शाळा इथपर्यंत पोहोचलेली आहे. शासकीय शाळांची क्षमता सिद्ध करणारा आणि सर्वांचा आत्मविश्वास वाढवणारा हा निकाल आहे.

शासकीय शाळेबाबत समाजाच्या मनातील नेहमीच्या सवयीने असलेली दुय्यम दर्जाची मानसिकता व न्यूनगंड नष्ट होऊन सर्वत्र सकारात्मक व विधायक विचार प्रवाह निर्माण होईल. या शाळेच्या यशाने शासकीय शिक्षण व्यवस्थेतील घटकांना आत्मविश्वास मिळेल. शासकीय शाळासुद्धा जागतिक पातळीवर प्रगत देशांच्या आणि खासगी शाळांच्या तोडीस तोड कामगिरी करीत आहेत व जागतिक स्पर्धेत सरस ठरत आहेत. येत्या 15 व 16 नोव्हेंबर रोजी अबुधाबी येथे या शाळेस एक कोटी रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande