संपूर्ण गणवेशात सहभागी होणार 21 हजारांहून अधिक स्वयंसेवक
नागपूर, 01 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उद्या, गुरुवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होणार आहे. याठिकाणी सरसंघचालकांच्या हस्ते शस्त्रपूजन आणि प्रमुख भाषण होईल. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या विशेष विजयादशमी उत्सवाचे मुख्य अतिथी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असून ते आज, बुधवारीच नागपुरात दाखल झालेत.
नागपूरमध्ये आगमनानंतर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला होता. कोविंद यांनी दीक्षाभूमीवर प्रार्थना केली. त्यानंतर दुपारी 4 वाजता ते संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या शुक्रवारी परिसरातील निवासस्थानाला भेट दिली. याच ठिकाणी डॉ. हेडगेवारांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी आपल्या 17 सहकाऱ्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. यावर्षी संघ स्थापनेच्या शतकपूर्ती सोहळ्याला प्रारंभ होतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजया दशमी उत्सवाला रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या वेळी संघाच्या शताब्दी वर्षाचाही औपचारिक प्रारंभ होणार आहे. या वर्षी शताब्दी वर्षानिमित्त संघाने देशभरात एक लाखांहून अधिक हिंदू संमेलन आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले आहे.
नागपुरात होणाऱ्या संघाच्या कार्यक्रमात दरवर्षी सुमारे 7 हजार स्वयंसेवक सहभागी होतात. यावर्षी शताब्दी वर्ष असल्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत तिप्पट म्हणजेच सुमारे 21000 स्वयंसेवक संपूर्ण गणवेशात या उत्सवात सहभागी होणार आहेत. संघाचा विजयादशमी उत्सव 1995 पासून नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर साजरा केला जातो. त्यापूर्वी हा कार्यक्रम कस्तूरचंद पार्क येथे भरवण्यात येत होता. यंदा संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला घाना, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका इत्यादी देशांमधून सुमारे 50 ते 60 प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच, लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता, डेक्कन उद्योग समुहाचे के. व्ही. कार्तिक आणि बजाज फिनसर्व्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज उपस्थित राहणार आहेत.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी