अमरावती, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) - दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आमदार रवि राणा आणि भाजप नेत्या, माजी खासदार सौ. नवनीत राणा यांनी गंगा-सावित्री निवासस्थान शंकर नगर येथून अंबा देवी व एकविरा देवी मंदिरापर्यंत अनवाणी महापदयात्रा काढली.गंगा-सावित्री निवास – केडिया नगर – राजापेठ – कुथे स्टॉप – राजकमल – गांधी चौक मार्गे ही पदयात्रा निघाली. शेकडो भाविक भक्त सहभागी झाले होते. ठिकठिकाणी राणा दाम्पत्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
अंबा देवी मंदिरात महाआरती करून, एकविरा देवीच्या चरणीही दर्शन घेण्यात आलं. आत्महत्या ग्रस्त शेतकरी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबीयांसह कष्टकरी, बेरोजगार, विद्यार्थी, व्यापारी व गृहिणींच्या जीवनात सुख-समृद्धी यावी, यासाठी देवी चरणी साकडं घालण्यात आलं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या समस्यांशी लढण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही राणा दाम्पत्याने केली. यावेळी संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.भाजप व युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो भाविक यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी