जळगाव, 1 ऑक्टोबर (हिं.स.) राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना राज्यात मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची माहिती वा खरेदी करिता मार्गदर्शक ठरावी म्हणून ग्रंथालय संचालनालयाकडून ग्रंथ निवड समितीच्या सदस्यांनी शिफारस केलेली वर्षनिहाय शासनमान्य ग्रंथांची यादी प्रकाशित करण्यात येते. यासाठी प्रकाशित ग्रंथ पाठवण्याचे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक यांनी केले आहे. या शासनमान्य ग्रंथांची यादी साठी सन २०२४ या कॅलेंडर (१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४) वर्षात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथांची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने सन २०२४ या कॅलेंडर वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत विनामुल्य ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई- ४०० ००१ यांच्याकडे, १५ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत पाठविण्यात यावीत. सन २०२४ या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. सदरचे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in व ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर ठेवण्यात आले असल्याचे, प्रभारी ग्रंथालय संचालक, अशोक गाडेकर यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर