रत्नागिरी, 1 ऑक्टोबर, (हिं. स.) : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नूतन वास्तूमध्ये सरस्वती पूजन अर्थात ग्रंथपूजेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाच्या नूतन इमारतीचे काम २५ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झाले. बरोबर ९ महिन्यात म्हणजे २ ऑक्टोबरला दसऱ्याचा मुहूर्त साधून वाचनालयाची ग्रंथसंपदा पूर्ववत नव्या वास्तूत आणून सकाळी ९.३० ते १०.०० या वेळेत सरस्वती पूजनाचे आयोजन वाचनालयाच्या नव्या इमारतीत करण्यात येणार आहे.
वाचनालयाचे एकूण बांधकाम १२००० चौरस फुटाचे असून त्यापैकी तळमजल्याचे ४००० चौ. फुटाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अंतर्गत सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. भूमिपूजनप्रसंगी वाचनालय दीपावलीपूर्वी नव्या वास्तूत सुरू करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार १ लाख १५ हजार ग्रंथ परत नव्या इमारतीत स्थानापन्न झाले असून दसऱ्याचे औचित्य साधून ग्रंथपूजा करून ग्रंथसंपदेचे नव्या वास्तूत स्वागत करण्याचे योजून हा उपक्रम राबवत असल्याचे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.
इमारत बांधण्याचे आव्हान स्वीकारून ते पूर्णत्वाकडे नेण्याचे अग्निदिव्य सुरू आहे. त्याचबरोबर वाचनालयाची ग्रंथसंपदा जतन करणे महत्त्वाचे कर्तव्य होते. ते पार पाडत परत पूर्ण ग्रंथसंपदा वाचनालयात आणण्यात येत आहे. विजयादशमीला सीमोल्लंघनाची प्रथा पार पाडण्यासाठी वाचनालय सज्ज झाले आहे. वाचनालयाचा आत्मा असलेली ग्रंथसंपदा परत वाचनालयात आलेली पाहण्याचे समाधान लाखमोलाचे आहे. नव्या वास्तूत ग्रंथांचे स्वागत करावे, ग्रंथरूपी सरस्वतीचे पूजन करावे या हेतूने गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ग्रंथपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दिवाळीपूर्वी १२ ऑक्टोबरपासून वाचनालयाचा सुसज्ज वाचन विभाग कार्यान्वित करण्याचा मनोदय असून पूर्ण वाचनालय फेब्रुवारीअखेरपर्यंत सज्ज करून रत्नागिरीचे सुसज्ज सांस्कृतिक केंद्र उभे करून लोकार्पण करण्यात येईल. मायदेश फाउंडेशन या कामी नवनव्या संकल्पना, योजना तयार करत असून एक सुसज्ज नव्या युगाचे वाचनालय साकारण्यासाठी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, अशी माहिती ॲड. पटवर्धन यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी