परभणी, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गंगाखेडमध्ये नाट्यमय वळण लागले. परळी नाका परिसरात सुरु असलेल्या रस्ता रोको आंदोलनादरम्यान सुरेश बंडगर या आंदोलकाने अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही काळ परिसरात मोठी खळबळ उडाली.
धनगर समाजाचे कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ समाजबांधवांनी रस्त्यावर उतरून देवा भाऊ, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा अशा घोषणाबाजीसह आंदोलन केले. याच दरम्यान सुरेश बंडगर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड तसेच इतर पोलीस कर्मचारी यांनी तातडीने हस्तक्षेप करून बंडगर यांना रोखले. नंतर त्यांना ताब्यात घेऊन तातडीने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी विठ्ठल रबधडे व अन्य आंदोलक उपस्थित होते. पोलिसांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis