सोलापूर, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा दूध संघाची पंढरपूर येथील जागा विक्रीस प्रतिसाद मिळत आहे. त्या जागेतून जवळपास 22 कोटी 65 लाख रुपये मिळणार आहेत. त्यातून दूध उत्पादक संस्थांची बिले, कर्मचार्यांचे वेतन देण्यात येईल, असे आश्वासन संघाचे व्हाईस चेअरमन दीपक माळी यांनी दिले.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबुरावअण्णा पाटील सभागृहात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी राजेंद्रसिंह भोसले, मारुती लवटे, अॅड. कळे, शिवाजी पाटील, शंभू भोसले उपस्थित होते.
माळी म्हणाले, दूध उत्पादक संस्थांची दोन कोटीवर थकबाकी तसेच वाहन पेट्रोल, कर्मचार्यांचे वेतन अशी बरीच रक्कम थकीत आहे. पंढरपूर येथील संस्थेच्या जागेची विक्री झाल्यानंतर लगेच सर्वांची देणी देण्यात येतील. तोट्यातील दूध संघ वाचविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत, अशी आमची मागणी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड