सोलापूर, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। पीएच.डी., नेट, सेट असूनही राज्यातील हजारो प्राध्यापक शासकीय नोकरीपासून वंचित आहेत. त्यामुळे राज्यातील रिक्त असलेल्या बारा हजारांपेक्षा जास्त जागा भराव्यात, अशी मागणी प्राध्यापकांतून होत आहे. मात्र, शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
सध्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होत असताना संपूर्ण राज्यात मात्र प्राध्यापकांच्या बारा हजारांपेक्षा जास्तीच्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनेक प्राध्यापक हे पीएच.डी. तसेच नेट, सेट असूनही त्यांना पदापासून वंचित राहावे लागत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयात जवळपास 800 प्राध्यापक हे कंत्राटी तसेच तासिका तत्त्वावर काम करत आहेत. तर राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे तसेच अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल 12 हजार 527 पेक्षा जास्त प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी चार हजार 300 प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाने अर्थ विभागाकडे सादर केला आहे. राज्यातील सर्व विद्यापीठामध्ये तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त असताना याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड