नाशिकमध्ये तब्बल वर्षभरापूर्वी धमकी आलेल्या तक्रारदारालाच पोलिसांकडून समज
नाशिक, 1 ऑक्टोबर (हिं.स.)वर्षभरापुर्वी विजयादशमीच्या दिवशी सकल हिंदू समाज व संभाजी भिडे प्रतिष्ठानच्यावतीने काढण्यात आलेल्या विजयी मिरवणूकीत महात्मा गांधीचे मारेकरी नथुराम गोडसे यांचे फोटो मिरविल्याने समाजमाध्यमावर प्रतिक्रीया दिली म्हणून भिडे समर्थक
नाशिकमध्ये तब्बल वर्षभरापूर्वी धमकी आलेल्या तक्रारदारालाच पोलिसांकडून समज


नाशिक, 1 ऑक्टोबर (हिं.स.)वर्षभरापुर्वी विजयादशमीच्या दिवशी सकल हिंदू समाज व संभाजी भिडे प्रतिष्ठानच्यावतीने काढण्यात आलेल्या विजयी मिरवणूकीत महात्मा गांधीचे मारेकरी नथुराम गोडसे यांचे फोटो मिरविल्याने समाजमाध्यमावर प्रतिक्रीया दिली म्हणून भिडे समर्थकांकडून आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीची पोलिसात एका वर्षापुर्वी तक्रार केल्यानंतर तब्बल वर्षानंतर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेवून धमकी देणाऱ्यांना समज देतांनाच तक्रारदारालाही समज देण्याचा अजब प्रकार घडला आहे.

भाकपाचे राज्य सरचिटणीस कॉ. राजू देसले यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. गेल्या वर्षी १५ ऑक्टोंबरला संभाजी भिडे प्रतिष्ठानच्यावतीने पंचवटी कारंजा येथून विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी त्यात सहभागी काही कार्यकर्त्यांच्या हातात नथुराम गोडसे यांचे फोटो होते. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी देसले यांची प्रतिक्रीया घेतली होती. देसले यांनी राष्ट्रपित्यांची हत्या करणाऱ्या गोडसेंचा उदोउदो निषेधार्ह असल्याची प्रतिक्रीया दिली होती. बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्यानंतर भिडे समर्थकांनी कॉ. देसलेंच्या भ्रमणध्वनीवर जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरूवात केली. यावर देसले यांनी पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या कानी घातला. त्यावेळी त्यांनी तक्रार करण्याची सुचना केली. देसले यांनी पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज दिल्यानंतर त्याची चौकशी थेट अंबड पोलिसांकडे सोपविण्यात आली. देसले यांचे कार्यालय सीबीएस परिसरात असून, तो भाग भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. असे असतांना अंबड पोलिसांकडे चौकशी सोपविण्याचे कोडे देसले यांना उमगले नाही. परंतु ते अंबड पोलिसात गेले असता, 'ही आमची हद्द नाही' असे सांगून देसले यांना परत पाठविण्यात आले व भद्रकाली पोलिसांकडे चौकशीसाठी अर्ज वर्ग करण्यात आला.

वर्षभरापुर्वी दिलेल्या तक्रारीची ससेहोलपट सुरू असताना मध्यंतरी तक्रार अर्जच गहाळ झाल्याचे कारण देण्यात आले. त्यानंतर अर्ज सापडला खरा, परंतु त्यासाठी वर्षाचा कालावधी उलटला. भद्रकाली पोलिसांनी धमकी देणाऱ्यांना कलम १४९ अन्वये समजपत्र देवून सोडून दिले असे देसले यांचे म्हणणे आहे. त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे पोलिसांनी देसले यांनाही समजपत्र दिली. ते का व कशासाठी दिले याचा उलगडाही पोलीस करू शकले नाहीत. तक्रारदाराला समजपत्र दिल्यानंतर पोलिसात यापुढे कोण चौकशीसाठी कोण येईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे एका तक्रारीच्या चौकशीसाठी वर्षभर वाट पहावी लागल्याबद्दल पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande