- माथेरान, कर्जत आणि नेरळ येथील तिन्ही गुन्ह्यांचा छडा
रायगड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या पथकाने पुन्हा एकदा आपली दक्षता आणि कार्यतत्परता सिद्ध केली आहे. तालुक्यातील धामोते गाव हद्दीत झालेल्या ट्रान्सफॉर्मर चोरीचा छडा लावत पोलिसांनी चार चोरट्यांना अटक करून तब्बल ३१० किलो वजनाचा आणि एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा तांब्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे नेरळ, माथेरान आणि कर्जत पोलीस ठाण्यातील तिन्ही चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी ही कामगिरी अभिमानाची ठरली आहे.
दिनांक ५ ऑगस्ट रोजी धामोते गावाजवळील डिस्कवरी रिसॉर्टच्या समोर, रोडच्या पलीकडे नदीकडील बाजूस बसवलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्यांनी १६० किलो वजनाची आणि अंदाजे २० हजार रुपये किमतीची तांब्याची कॉइल चोरून नेली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. विकास धर्मा पेरणे यांनी ६ ऑगस्ट रोजी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आला. डीबी पथकाने सातत्याने शोधकार्य करत तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि बातमीदारांच्या मदतीने गुन्ह्याचा तपास पुढे नेला. अखेर २६ सप्टेंबर रोजी पोलिसांना मोठे यश मिळाले.
या दिवशी पोलिसांनी चंदन बाबू ठोंबरे, सुनील अनंता हिंदोळा, पांडुरंग हिंदोळा (सर्व रा. कोंड्याची वाडी, उशीर, ता. कर्जत, जि. रायगड) आणि विष्णू भालचंद्र कडाळी (रा. शाळांतवाडी, पाटगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे) या चौघांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. चौकशीत त्यांनी नेरळ व्यतिरिक्त माथेरान व कर्जत ठाण्यातील अशा प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तब्बल ३१० किलो वजनाचे तांब्याचे कॉइल, ज्याची किंमत सुमारे एक लाख रुपये इतकी आहे, हस्तगत केली. या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप फड, हवालदार सचिन वाघमारे, शिपाई राजेभाऊ केकान, आशु बेंद्रे आणि विनोद वांगेकर यांनी या मोहिमेत विशेष परिश्रम घेतले.
नेरळ पोलिसांनी एकाच वेळी तिन्ही गुन्ह्यांचा छडा लावत केवळ आरोपींना गजाआड केले नाही, तर चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमालही हस्तगत केला. पोलिसांच्या धडाकेबाज आणि अभिमानस्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके