वॉशिंग्टन , 1 ऑक्टोबर (हिं.स.)। इस्रायल आणि हमास यांच्यात मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांती कराराची प्रस्तावना मांडली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, हमासकडे त्यांच्या २०-पॉईंटच्या शांती प्रस्तावावर उत्तर देण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी आहे. जर त्यांनी हे करार मान्य केले नाही, तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतील,असा इशारा ट्रम्प यांनी हमासला दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, उर्वरित सर्व संबंधित पक्षांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि आता ते फक्त हमासच्या उत्तराची वाट पाहत आहेत. ट्रम्प यांनी कडक शब्दांत इशारा देत सांगितले, “सर्व अरब देश, सर्व मुस्लिम देश आणि इस्रायलनेही या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आता आम्ही फक्त हमासची वाट पाहत आहोत. तो प्रस्ताव मान्य करेल किंवा नकार देईल आणि जर नकार दिला, तर परिणाम अत्यंत गंभीर असतील.”
एका अहवालानुसार, फिलिस्तीनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “हमासने देशांतर्गत आणि देशाबाहेरील आपल्या राजकीय व लष्करी नेतृत्वासोबत चर्चा सुरू केली आहे.” त्यांनी सांगितले की हा विषय इतका गुंतागुंतीचा आहे की चर्चा पूर्ण होण्यासाठी काही दिवस लागू शकतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध समाप्त करून शांती प्रस्थापित करण्यासाठी २० पॉईंटची शांती योजना सादर केली होती. सोमवार, २९ सप्टेंबर रोजी ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही योजना जाहीर करण्यात आली.या योजनेमध्ये गाझामधील युद्ध तात्काळ थांबवणे, हमासकडून बंधक बनवलेल्या सर्व व्यक्तींची ७२ तासांत सुटका,गाझामधून इस्रायलची टप्प्याटप्प्याने माघार असे महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत.
भारत, चीन, रशिया यांच्यासह आठ अरब व मुस्लिम बहुल देशांनी या योजनेचे स्वागत केले आहे.जॉर्डन, कतार, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्किये, सौदी अरेबिया आणि इजिप्त या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रम्प यांच्या शांती योजनेचे समर्थन केले आहे. संयुक्त निवेदनात मंत्र्यांनी सांगितले की युद्ध थांबवणे, गाझाचा पुनर्निर्माण करणे,फिलिस्तिनी जनतेचे विस्थापन रोखणे आणि संपूर्ण पटलावर शांती प्रस्थापित करणे या बाबींसाठी अमेरिकेशी भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे, आणि ट्रम्प यांच्या योजनेचे ते स्वागत करतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode