अतिवृष्टी, पीक नुकसानीमुळे तुळजापूरातील शेतकऱ्याने केली आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उमेश सूर्यकांत ढेपे (४५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी आपल्या राहत
Q


छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उमेश सूर्यकांत ढेपे (४५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

उमेश ढेपे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मुला-बाळांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने तातडीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश ढेपे यांची अणदूर शिवारात शेती होती. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक चिंतेत होते. या नैराश्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे.

कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा केला जातो आहे.

या घटनेने पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande