मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - शिवसेना उबाठा गटाचा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या दसरा मेळाव्याचे बजेट तब्बल ६३ कोटी रुपये असल्याचा दावा भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. या संदर्भात
उपाध्ये यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.
केशव उपाध्ये यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ६३ कोटींचा दसरा मेळावा… नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार हे या आकड्यावर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज नऊ हवी, टक्केवारी नऊपेक्षा कमी नसावी, इतकंच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या ३६ च्या आकड्याची बेरीजही नऊ असावी, याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाच्या दसरा मेळाव्याचे नियोजनही ६३ कोटींच्या घरात असणार आहे. गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती!”
मेळाव्यासाठी तब्बल ६३ कोटी रुपयांचं नियोजन झाल्याचं या गटातील नेत्यानेच हर्षोल्हासित होत सांगितले. सभेचं ठिकाण, स्टेज सजावट, जाहिराती, सोशल मिडीया, त्याशिवाय लोकांना आणायला गाड्या, गाडीत बसून लोकांना मेळाव्याला येता यावे म्हणून, शिवाय त्यांच्या वडापाव, चहापाण्याची व्यवस्था असं सगळं मिळून हे ६३ कोटी लागणार आहेत म्हणे. या ६३ कोटी रुपयांमध्ये अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती? किती घरे वसवली गेली असती?”
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना लोक स्वतःहून उत्साहात यायचे. तेव्हा सेना प्रमुखांच्या विचारांच सोनं असायचं. आता तशी परिस्थिती नाही! मागचे काही मेळावे आठवा… मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं ही रडगाणी ऐकायला एकट्या गटातून गर्दी, पण गोळा होत नाही म्हणून ३६ चा आकडा मोडून ६३ ची गोळाबेरीज करण्याचा हा आटापीटा!”
उपाध्ये म्हणाले, रडगाण्याचे तेच बेसूर सूर आळवायला खरंच ६३ कोटींचा मेळावा घ्यायची गरज आहे का? हवं तर उद्धव ठाकरेंच्या नावाने मराठवाड्यात मदत करा पण हे ६३ कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा.”
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी