मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं संकट आहे. मी सरकारला हात जोडून विनंती देखील केली की, या संकटात राजकारण न आणता सर्व एकत्र येऊन मार्ग कसा काढता येईल हे पाहू शकतो. पण सरकारची तशी तयारी दिसत नाही. जर साखर सम्राट भाजपात गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींची हमी सरकार घेत असेल म्हणजेच त्यांनी कर्ज बुडवलं, तर ते पैसे सरकार म्हणजे सर्वसामान्य जनता भरणार. तर या साऱ्या शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजपाप्रणित सरकार बघतंय आहे का? ही अत्यंत संतापजनक बाब आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ठाकरे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावर देखील स्वतःचे फोटो छापून वाटण्यात मग्न आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री तर काही अंगाला लावूनच घेत नाहीत. कोणताही विषय आला तर हे दुसरे उपमुख्यमंत्री कधीच दिसत नाहीत, जनता वाऱ्यावर पडलेली आहे. महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं संकट असताना मुख्यमंत्री फडणवीस हे ओला दुष्काळ ही संज्ञाच नसल्याचे सांगत आहेत. नियमामध्ये ओला दुष्काळ नाही असे त्यांचे म्हणणे आहे. मग जर ओला दुष्काळ ही संज्ञा नसेल, तर राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे की नाही? अशी विचारणा करीत स्वत: फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना तत्कालिन मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती, याबद्दलचे पत्रच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.
साखरसम्राट भाजपामध्ये गेले आणि शेकडो-करोडो रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडून थकहमी मिळवली. आम्ही मागणी करतोय ती शेतकर्यांसाठी करतोय. ज्या शेतकर्यांना जमीन गहाण टाकावी लागते, बैलजोडी गहाण टाकावी लागते, कधीकधी पत्नीच मंगळसूत्र देखील गहाण टाकावं लागतं. कारण काहीतरी गहाण टाकल्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नाही. त्यांच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही. आज परिस्थिती अशी आहे की डोळ्यांदेखत त्यांचं पीक जमिनीसकट उद्ध्वस्त झालं आहे आणि ते कर्जाच्या ओझ्याखाली दबून मेले आहेत. रोज शेतकरी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले ओला दुष्काळ जाहीर करण्यासंबंधीचे पत्र देखील वाचून दाखवले. यावळे पुढे बोलताना ठाकरेंनी त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार देखील केला. ते म्हणाले की, शेतकर्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा नाहीतर तुमच्या अकलीचा दुष्काळ म्हणा, काहीही म्हणा पण शेतकरी आज संकटात आहे. शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी ५० हजारांची मदत झाली पाहिजे. बाकीचे देखील खूप विषय आहेत. कारण घरं दारं वाहून गेली आहेत. पंतप्रधान आवास योजना यासारखी ग्रामीण योजना नव्याने आणा, अशी मागणीही ठाकरेंनी यावेळी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी