सोलापूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। सीना नदीचा महापूर ओसरला असून सध्या नदीत ४५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे उजनीतून सोडलेल्या पाण्याचा २५ हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत आहे. पण, वडकबाळजवळील हत्तूर परिसरात सोलापूर-विजयपूर महामार्गावर अजूनही पाणी आहे. त्यामुळे उद्याही (बुधवार) हा महामार्ग वाहतुकीसाठी बंदच राहणार आहे.
सीना नदीत दीड लाखांचा तर भीमा नदीत सव्वालाखाचा विसर्ग सुरू होता. तो आता कमी झाला तरी त्याचा परिणाम जाणवायला १० ते १४ तास लागतात. त्यामुळे वडकबाळजवळील पाणी ओसरले, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सीना-भीमा नदीच्या संगमावर भीमा नदीत मोठा विसर्ग असल्याने सीनेचे पाणी पुढे जात नाही. त्यामुळे हत्तूरजवळील महामार्गावर पाणी होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने त्या महामार्गावरील वाहतूक सुरू केली नाही. सध्या या महामार्गावरील वाहतूक कामती-तेरामैलमार्गे पुढे सोडली जात आहे. हत्तूरजवळ महामार्गावर पाणी असल्याने वडकबाळ पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड