अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असल्याने या वर्षीपासून ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचबरोबर, ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर हा सप्ताह ‘अभिजात मराठी भाषा सप्
अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन


मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असल्याने या वर्षीपासून ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचबरोबर, ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर हा सप्ताह ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शासनाच्या मराठी भाषा विभागाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त मुंबई, नागपूर व अमरावती येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मुंबई प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त कार्यक्रम होणार असून यावेळी अभिजात भाषा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात विशेष टपाल तिकिट व विशेष आवरणाचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच अभिजात मराठी भाषा विषयक विविध ग्रंथ, पुस्तके व विशेष अंकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ४ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११ वाजता पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे ‘ऑनलाईन मराठी : स्थिती व गती’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे ‘शिव-शक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’ या पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर येथील वनामती सभागृह येथे ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘माझ्या मराठीचा टिळा’ या निवडक कवितांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे ६ आणि ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता अभिजात भारतीय भाषातज्ज्ञ परिषद २०२५ होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अमरावती शहराजवळील ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहे.

या सप्ताहामध्ये राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या यू-ट्यूब चॅनेलवरून ७ ऑनलाईन कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहेत. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळाला, त्याची एकूण प्रक्रिया कशी होती आणि अभिजात भाषा सप्ताहामागची भूमिका’ हा कार्यक्रम दाखविला जाईल. ‘मराठी भाषेची उत्पत्ती आणि अभिजातता’ हा कार्यक्रम ४ ऑक्टोबर रोजी, मराठी भाषेतील म्हणी, वाक्यप्रचार आणि भाषेचे व्याकरण हा कार्यक्रम ५ ऑक्टोबरला, मराठी भाषेतील वृत्त आणि त्यांचे सौंदर्य हा कार्यक्रम ६ ऑक्टोबरला दाखविण्यात येईल. बोलीभाषा आणि प्रमाणभाषा हा कार्यक्रम ७ ऑक्टोबर रोजी, मराठी भाषा अर्थार्जनाची भाषा हा कार्यक्रम ८ ऑक्टोबरला तर नव्या पिढीची मराठी भाषा हा कार्यक्रम ९ ऑक्टोबर रोजी यू-ट्यूबवरून प्रसारित होणार असल्याचे मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande