2 लाख 90 हजार क्यूसेकच्या महापुरावर विष्णुपुरी प्रकल्पातून नियंत्रण
नांदेड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।नांदेड शहराची तहान भागवण्यासाठी, तीन तालुक्यांतील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि नांदेड एमआयडीसीच्या विकासासाठी स्व. शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून विष्णुपुरी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मागील पंचवीस वर्षांपासून गोद
1


नांदेड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।नांदेड शहराची तहान भागवण्यासाठी, तीन तालुक्यांतील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि नांदेड एमआयडीसीच्या विकासासाठी स्व. शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून विष्णुपुरी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मागील पंचवीस वर्षांपासून गोदावरी नदीला एवढा मोठा पूर कधीच आला नव्हता. साधारणतः दरवर्षी एक लाख ते सव्वा लाख क्यूसेक एवढा पूर येत असे. परंतु यंदा प्रथमच तब्बल 2 लाख 90 हजार क्यूसेक एवढा प्रचंड महापूर आल्याने प्रशासनासमोर अभूतपूर्व आव्हान उभे राहिले होते.

परंतु जिल्हा प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीमुळे व विष्णुपुरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे विष्णुपूरी प्रकल्पाच्या पूरपरिस्थतीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले आहे.

17 दरवाजे प्रथमच पूर्णपणे उघडले

पूर्वी पूरनियंत्रणासाठी केवळ सव्वा लाख ते दीड लाख हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यासाठी काही दरवाजे उघडले जात असत. 2006 मध्ये सर्वाधिक 12 दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु यंदा आलेल्या महापुरामुळे प्रथमच विष्णुपुरी प्रकल्पाचे 17 चे 17 दरवाजे पूर्णपणे उघडावे लागले. हे मोठे संकट समोर असताना प्रशासनाने वेळीच निर्णय घेतला आणि पुराचे पाणी सुरक्षितपणे सोडण्यात यश मिळवले.

प्रत्यक्षात प्रकल्पातील पाच दरवाजे मोठ्या नादुरुस्तीत होते. त्यामुळे एवढ्या महापुराच्या वेळी ते कार्यान्वित करणे हे पाटबंधारे विभागासमोर मोठे संकट होते. अशा परिस्थितीत कार्यकारी अभियंता दत्तात्रय रा. सावंत, चारुदत्त बनसोडे, अशोक चव्हाण, नवनाथ पिसोटे (उपअभियंता) तसेच सहाय्यक अभियंता शिवम ससाने यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले. रात्रंदिवस प्रयत्न करून, अवघ्या काही तासांत नादुरुस्त दरवाज्यांची दुरुस्ती करण्यात आली. परिणामी 17 पैकी एकही दरवाजा अडथळ्याविना कार्यान्वित करण्यात आला.

या यशस्वी पुरनियंत्रणामुळे मोठा अनर्थ टळला. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच प्रशासनाने कार्यकारी अभियंता आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

पंचवीस वर्षांनंतर आलेल्या एवढ्या प्रचंड महापुराच्या वेळी विष्णुपुरी प्रकल्पाची भूमिका अतिशय निर्णायक ठरली. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे व कौशल्यामुळे नांदेड जिल्हा एका मोठ्या आपत्तीपासून वाचला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande