नांदेड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तविली आहे. गोदावरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा सध्याचा वेग लक्षात घेता सदरचा विसर्ग शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पस्थळी 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेनंतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पस्थळी 3.50 ते 4 लक्ष क्सुसेक्स विसर्ग नदीपात्रात वाहणार आहे. सदर विसर्ग 24 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ राहण्याची शक्यता आहे. नांदेड शहरात गोदावरी नदीची इशारा पातळी 351 मीटर व धोका पातळी 354 मीटर आहे. सदरील विसर्गामुळे धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने नागरीकांनी संभाव्य उपाययोजना कराव्यात व तशी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अ. आ. दाभाडे यांनी केले आहे.
आज 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वा. शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पामधून 2 लक्ष क्युसेक्स इतका विसर्ग चालू आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 सप्टेंबर रोजी रात्री 11 वा. जायकवाडी धरणातून 3 लक्ष क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आले आहे. जायकवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग चालू आहे. शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचे 17 दरवाजे 28 सप्टेंबरपासून पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. धरणात येणारी आजची आवक सरासरी 2 लक्ष क्युसेक्स असून त्यात आज दुपारी 1 वाजेपासून वाढ होण्यास सुरवात झाली आहे.
पावसाच्या परिस्थितीत काही बदल झाल्यास, प्रकल्पस्थळी येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेवून हा विसर्ग कमी अथवा जास्त होण्याची शक्यता आहे. काही समाजमाध्यमाद्वारे नागरिकांमध्ये विसर्गाबाबत चुकीची अथवा अवास्तव माहिती पसरविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वस्तुनिष्ठ माहितीसाठी पूर नियंत्रण कक्ष, सिंचन भवन, नांदेड दुरध्वनी क्र. 02462-263870 या क्रमांवर संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis