गुवाहाटी, १ ऑक्टोबर (हिं.स.). भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात शानदार पद्धतीने केली. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव करत भारताने विजयी सलामी दिली आहे. फंलदाजी आणि गोलंदाजीची आपली जादू दाखवणारी दीप्ती शर्मा ही बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने कठीण परिस्थितीतून बाहेर पडून आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सुरुवातीच्या विकेट गमावल्यानंतर दीप्ती शर्मा (८७ धावा) आणि अमनजोत कौर (५७ धावा) यांनी सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी करून संघाला बळकटी दिली. हरलीन देओल (४८) आणि प्रतीका रावल (३७) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
डीएलएस पद्धतीने २७१ धावांचे लक्ष्य ठेवणाऱ्या श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकांत २११ धावांतच गारद झाला. फक्त कर्णधार चामारी अटापट्टू (४३), निलाक्षी डी सिल्वा (३५) आणि हर्षिता समरविक्रमा (२९) यांनाच काहीसा प्रतिकार करता आला.गोलंदाजीत दीप्ती शर्माने तीन विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इतर गोलंदाजांनी सातत्याने दबाव कायम ठेवला आणि भारताला विजय साकारुन दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे