नवरात्रात स्त्रीशक्तीचा गजर पण रोषणखेडा येथे विधवा बेघर
अमरावती, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) एका बाजूला नवरात्रोत्सवात देवीची पूजा करून यत्र नार्यस्तु पूज्यन्ते... असा घोष सुरु असताना, दुसऱ्या बाजूला वरुड तालुक्यातील रोषणखेडा येथे एका विधवा महिलेचे घर नायब तहसिलदारांच्या आदेशावरून पाडण्यात आले आणि ती महिला दोन मु
नवरात्रात स्त्रीशक्तीचा गजर, पण रोषणखेडा येथे विधवा बेघर   प्रहारच्या ठिय्या आंदोलनाने प्रशासनाला घाम


अमरावती, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) एका बाजूला नवरात्रोत्सवात देवीची पूजा करून यत्र नार्यस्तु पूज्यन्ते... असा घोष सुरु असताना, दुसऱ्या बाजूला वरुड तालुक्यातील रोषणखेडा येथे एका विधवा महिलेचे घर नायब तहसिलदारांच्या आदेशावरून पाडण्यात आले आणि ती महिला दोन मुलांसह रस्त्यावर आली. प्रशासनाची ही कारवाई केवळ धक्कादायकच नाही तर मानवी संवेदनांना हरवणारी ठरली आहे.

घर उद्ध्वस्त झालेल्या महिलेने मदतीसाठी धाव घेतली, पण कुठूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर तिने प्रहार संघटनेकडे धाव घेतली. आणि मग वरुड तालुका प्रहार संघटना अक्षरशः तिच्या मदतीला उभी राहिली. आज (दि. १ ऑक्टोबर २०२५) प्रहार कार्यकर्त्यांनी महिलेचे घर पाडून बाहेर फेकलेले सामान थेट तहसिल कार्यालयात नेऊन ठेवले. एवढ्यावरच न थांबता उपाशी असलेल्या महिलेबरोबर तहसिलदारांच्या दालनातच जेवण करून ठिय्या आंदोलन सुरु केले. प्रहार तालुका संघटक अजय चौधरी व तालुका प्रमुख प्रणव कडू यांनी थेट प्रशासनाला जाब विचारला ते म्हणाले नायब तहसिलदारांना खरोखर घर पाडण्याचा अधिकार आहे का? न्यायालयाचा आदेश न घेता ही कारवाई कशी केली? नोटीस दिल्याच दिवशी घर पाडणे हा नियम आहे का? या प्रश्नांना तहसिलदार शेळके व सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. शेवटी चूक झाली, यापुढे अन्याय होणार नाही अशा आश्वासनावरच प्रशासनाला पायउतार व्हावे लागले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी प्रहार आक्रमण संघटनेचे अध्यक्ष गजानन ब्राम्हणे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे विलास पंडागळे, लिलाधर काकडे, अजय बहुरुपी, सुरेश नागले आदींसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

स्त्री शक्तीची थट्टा

आज नवरात्रात देवीचे गुणगान करणारे समाजमन आणि संवेदनशून्य प्रशासन या दोन टोकांची विसंगती ठळकपणे समोर आली. विधवा महिलेचे घर उद्ध्वस्त करून तिला बेघर करणाऱ्यांनी स्त्रीशक्तीची थट्टाच उडवली. मात्र प्रहार संघटनेने तिच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून प्रशासनाला धडा शिकवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande