ठाणे , 1 ऑक्टोबर (हिं.स.)। ठाणे शहरात अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकासकांच्या भ्रष्टाचारामुळे वर्षानुवर्ष रखडल्या असून सर्वसामान्य रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. यातील अनेक योजना मार्गी लावण्यात आमदार संजय केळकर यांना यश येत आहे. नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत त्यांनी तब्बल १९ वर्षे रखडलेल्या योजनेला चालना दिल्याने हवालदिल झालेल्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
खोपट परिसरातील आनंद आझाद हाउसिंग सोसायटीची झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेली १९ वर्षे ठप्प आहे. येथील १०७ कुटुंबे हक्काच्या घरांपासून वंचित राहिल्याने ते भयभीत आहेत. या दीर्घ काळात विकासक बदलले पण इमारत काही उभी राहिली नाही. विशेष म्हणजे दबावाखाली रहिवाशांना तक्रार करणेही दुरापास्त झाले होते. अखेर येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली.
श्री.केळकर यांनी तातडीने शासकीय विश्रामगृहात विकासक, एसआरए अधिकारी आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेत चर्चा केली. यावेळी एसआरएचे राजकुमार पवार, श्री. बांगर आणि विकासक यांच्यासह अनेक रहिवासी उपस्थित होते. यात प्रामुख्याने महिलांचा जास्त सहभाग होता. गेल्या १९ वर्षांत झालेली फरफट आणि विकासकांचा भोंगळ कारभार यामुळे कुटुंबांची झालेली वाताहत याचा पाढा रहिवाशांनी वाचला. श्री.केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना देतानाच विकासकाला देखील १५ दिवसांची मुदत दिली. यावेळी विकासकाने १५ दिवसांत बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले. विकासक याकामी असमर्थ ठरल्यास स्वयं पुनर्विकासाची योजना हाती घेऊ, असा इशाराही श्री.केळकर यांनी दिला. सुमारे दोन तास झालेल्या चर्चेत सकारात्मक तोडगा निघाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी श्री.केळकर यांचे आभार मानले.
याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, शहरात अनेक ठिकाणी पुनर्वसनाच्या आणि पुनर्विकासाच्या योजना विकासकामुळे रखडल्या असून रहिवाशांना भाडेही मिळत नाही आणि हक्काचे घरही मिळत नाही. या योजनांना चालना देण्यात आम्हाला यश येत असून खोपट येथील शेकडो रहिवाशांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. त्यांना घरे मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे श्री. केळकर यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर