पुणे - व्याज परताव्यासोबतच उद्योजकता प्रशिक्षण
पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.)आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने बँक कर्जावरील व्याज परतावा योजना राबविण्यापुरते मर्यादित न राहता, लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश
पुणे - व्याज परताव्यासोबतच उद्योजकता प्रशिक्षण


पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.)आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने बँक कर्जावरील व्याज परतावा योजना राबविण्यापुरते मर्यादित न राहता, लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले उद्योजकता प्रशिक्षण व मार्गदर्शन देखील उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली.

याअंतर्गत उद्योग-सारथी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये “पशुपालन व दुग्ध व्यवसाय” या विषयावर पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले.

या वेबिनारमध्ये दुग्धव्यवसायासाठी योग्य जातीच्या जनावरांची निवड, संतुलित आहार व्यवस्थापन, आरोग्य काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना, आर्थिक नियोजन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित लाभार्थ्यांनी थेट शंका विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवले.

महामंडळाच्या वतीने राज्यभरातील युवक, महिला उद्योजिका व स्वयं-सहायता गटांसाठी अशा प्रकारच्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमामुळे उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीस चालना मिळणार आहे, असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande