सोलापूर, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) - अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे पशुपालकांचे अतोनात हाल सुरू आहेत. पावसामुळे चारा पिकांची पेरणीच कमी झाली, ज्या ठिकाणी झाली अतिवृष्टीने तेथील चारा सडला आहे आणि नदीकाठी पुरामुळे चारा वाहून गेल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या कडब्याची एक पेंडी ४५ रुपयांना तर हिरव्या चाऱ्याची पेंडी ८० रुपयांपर्यंत गेली आहे. जनावरांना अर्धपोटी ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सहा महिन्यांपासून जिल्ह्यात काही तालुक्यात पाऊस सुरू आहेच. यामुळे चाऱ्याची पेरणीच होऊ शकली नाही तर ज्या ठिकाणी चाऱ्याची पेरणी झाली अशा ठिकाणी हाताशी आलेला चारा अतिवृष्टीमुळे पाण्यात बुडाला. यामुळे जनावरांना खायला काय द्यावे, असा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
सीना नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचा चारा गोठ्यावरच राहिला. जनावरांसाठी साठवलेल्या वैरणीच्या गंजी, मुरघास पिशव्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्याचबरोबर नदीकाठी असलेला चारा पाण्यात बुडाल्यामुळे कुजला आहे. आता जनावरांना जगवावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. सध्या पूरस्थितीमुळे जनावरे उंच भागावरील रस्त्यावरच बांधली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड