पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। रोज न चुकता व्यायाम करा,हास्यक्लब मध्ये जा,स्वतःवर प्रेम करा आनंदी राहा. शारीरिक,मानसिक,अध्यात्मिक,भौतिक अश्या सुखांचा पाया म्हणजेच निरोगी काया. या जगातील सर्वात मोठे सुख म्हणजे आपले शरीर निरोगी असणे. आपल्या मनाला वय नसते,मन हे चिरतरुण असते,म्हणूनच कायम सकारात्मक विचार करा असा सल्ला सुप्रसिद्ध व्याख्याते व माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी दिला.
सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकातर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध व्याख्याते व माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांना प्रमुख व्याख्याते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मनशक्ती आणि तणाव मुक्ती हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.सौ. संजीवनी मुजुमदार,मानद संचालिका,सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.
या प्रसंगी बोलताना डॉ. कोहिनकर यांनी स्वसंवाद,अंतर्मन व बाह्यमन याबद्दल माहिती दिली व ध्यानाचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले. बाहेर जगातील हजारोयुद्धे जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचे एक युद्ध जिंका जेणेकरून आयुष्यात शांतता मिळेल. रोज झोपण्याआधी १० मिनिटे व झोपेतून उठल्यावर १० मिनिटे सकारात्मक गोष्टींचा विचार करा. आपल्याला जी सुखे अनुभवायची आहेत ती आपल्याला मिळाली आहेत असा अनुभव मनातून घ्या. आपण ज्या प्रकारचा विचार करतो,जी चलचित्रे पाहतो जी वाक्ये बोलतो ज्या प्रकारच्या मानसिकतेमध्ये कायम राहतो त्याच प्रकारची परिस्थिती,माणसे व वस्तू आपल्याकडे आकर्षित करतो आपण जे आहोत तेच आपल्याकडे आकर्षित करतो असे देखील डॉ. कोहिनकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु