ठाणे, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। ठाण्याची झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या पंचवीस वर्षात ठाण्यात आमूलाग्र बदल झाला असून आता राज्यातील सर्वाधिक विकसित होत असलेले शहर असा लौकिक ठाण्यास मिळाला आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गडकरी रंगायतन येथे ठाणे महापालिकेच्या ४३वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
ठाणे महापालिकेच्या ४३व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, यावर्षीच्या गणेशोत्सव आरास स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मीनल पालांडे, एसआरएचे राजकुमार पवार उपस्थित होते.
ठाण्याच्या विकासाचा धर्मवीर आनंद दिघे यांचा विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुढे कायम ठेवला आहे. त्यातूनच महापालिकेने नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले. ठाण्याचा कायापालट झाला आहे, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
तर, गणेशोत्सव आरास स्पर्धा ही धर्मवीर आनंद दिघे यांनी संकल्पना. गणेशोत्सवात कलाकार आणि कार्यकर्ते घडतात. त्यामुळे त्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. यंदा या स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाला दिशा मिळाली आहे. ठाणे शहर बदलतंय आणि त्यात महापालिका अधिकारी व कर्मचारी यांचाही वाटा असल्याचेही खासदार म्हस्के यांनी स्पष्ट केले.
आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. वर्षभरात जे केले त्याची उजळणी आणि पुढे जे काम करायचे त्यासाठी वचनबद्ध होण्याचा हा दिवस असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी प्रास्ताविकात केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा २०२५चे पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच, या स्पर्धेचे परीक्षण करणारे ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी व किशोर नादावडेकर आणि ठाणे वैभवचे ज्येष्ठ पत्रकार आनंद कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला.
आरास स्पर्धेतील विजेते
या आरास स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सजावटीसाठीचा प्रथम क्रमांक (पारितोषिक - रुपये २५ हजार) शिवसम्राट मित्र मंडळ, गांधीनगर यांना मिळाला. तर, दुसरा क्रमांक (रुपये २० हजार) - गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा यांना, तिसरा क्रमांक (रुपये १५ हजार) - कोलबाड मित्र मंडळ, कोलबाड यांना तर, उत्तेजनार्थ पारितोषिक (रुपये १० हजार) - गोपाळ गणेश मित्र मंडळ - आझाद नगर यांना मिळाले.
उत्कृष्ट मूर्तीकारासाठीच्या स्पर्धेत, प्रथम क्रमांक (रुपये १० हजार) - राकेश घोष्टीकर - श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ यांना, द्वितीय क्रमांक (रुपये ७ हजार) - मदन नागोठणेकर- सार्वजनिक उत्सव मंडळ यांना तर, तृतीय क्रमांक (रुपये ५ हजार) - मिलिंद सुतार - जय भवानी मित्र मंडळ यांना मिळाला.
स्वच्छतेच्या स्पर्धेत, प्रथम क्रमांक (रुपये १० हजार) - काजूवाडी वैती नगर रहिवासी मंडळ, काजूवाडी यांना, द्वितीय क्रमांक (रुपये ७ हजार) - शिवगर्जना मित्र मंडळ, उथळसर यांना आणि तृतीय क्रमांक (रुपये ५ हजार) - स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ, सावरकर नगर यांना मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर