मेक्सिको सिटी, 11 ऑक्टोबर, (हिं.स.) - मेक्सिकोमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे व्यापक संकट ओढवले आहे. मध्य आणि आग्नेय मेक्सिकोमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. घरे आणि महामार्गांचे नुकसान झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे किमान २८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
बाधित भागातील विविध भागांमधून रस्ते नद्यांमध्ये रूपांतरित झाल्याचे चित्र पहायाला मिळत आहे. वाहने आणि घरे जवळजवळ पूर्णपणे बुडाली आहेत. नागिरकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. मेक्सिकोने मदतीसाठी ८,७०० लष्करी कर्मचारी तैनात केले आहेत.
राज्याचे गृह सचिव गिलेर्मो ऑलिव्हरेस रेयना यांच्या मते, सर्वात जास्त नुकसान झालेल्या भागांपैकी एक म्हणजे मध्यवर्ती राज्य हिडाल्गो आहे. या ठिकाणी १६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. भूस्खलन आणि वाहणाऱ्या नद्यांमुळे राज्यातील किमान १,००० घरे, ५९ रुग्णालये आणि दवाखाने आणि ३०८ शाळांचे नुकसान झाले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील ८४ नगरपालिकांपैकी सुमारे १७ नगरपालिकांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पुएब्ला राज्यात, गव्हर्नर अलेजांद्रो आर्मेन्टा यांनी नऊ जणांचा मृत्यू आणि १३ जण बेपत्ता असल्याची माहिती दिली. पुराच्या पाण्यात छतावर अडकलेल्या १५ जणांना वाचवण्यासाठी त्यांनी संघीय सरकारची मदत मागितली. ज्यात काही मुलांचा समावेश आहे. त्यांनी अंदाज लावला की, मुसळधार पावसामुळे सुमारे ८०,००० लोक प्रभावित झाले आहेत आणि भूस्खलनामुळे गॅस पाइपलाइन फुटली आहे.
गव्हर्नर रोसिओ नाहले यांनी सांगितले की, वेराक्रूझच्या आखाती किनाऱ्यावरील राज्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ५,००० घरांचे नुकसान झाले आहे आणि नौदलाने सुमारे ९०० लोकांना बाहेर काढले आहे. पोझा रिका शहर नदीच्या पुरामुळे सर्वात जास्त प्रभावित झाले आहे. खबरदारी म्हणून अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
यापूर्वी मध्यवर्ती राज्यातील क्वेरेटारो येथील अधिकाऱ्यांनी भूस्खलनात अडकून एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. आणि त्यामुळे ३२०,००० हून अधिक ग्राहक प्रभावित झाले आहे. 6 राज्यांमधील सुमारे १,००० किलोमीटर रस्त्यांचे नुकसान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे