ताइपेइ, 11 ऑक्टोबर (हिं.स.) - चीनकडून मोठ्या हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर तैवान आपल्या स्वसंरक्षणासाठी तयारी करत आहे. शुक्रवारी राष्ट्रीय दिनानिमित्त तैवानने जाहीर केले की, ते कोणत्याही बाह्य हवाई हल्ल्याला रोखण्यासाठी ’टी-डोम’ बांधेल. हे हवाई संरक्षण सुरक्षा जाळे देशातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करेल. याआधी जगात अमेरिकेचा “गोल्डन डोम” आणि इस्रायलचा “आयर्न डोम” उपलब्ध आहे. त्याच मॉडेलनुसार हे संरक्षणात्मक कवच विकसित करणार आहे.
तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांनी राष्ट्रीय दिनाच्या भाषणात सांगितले की, देश आता ‘मल्टी-लेयर्ड एअर डिफेन्स सिस्टम’ उभारणार आहे. जी शत्रूच्या प्रत्येक स्तरावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देऊ शकेल. आम्ही ‘T-Dome’ चं बांधकाम वेगाने पूर्ण करू, जेणेकरून देशात एक मजबूत आणि सशक्त हवाई संरक्षण प्रणाली उभी राहील. यात हाय-लेव्हल डिटेक्शन आणि प्रभावी इंटरसेप्शन दोन्ही तंत्रज्ञान असतील. तैवान आता शक्तीद्वारे शांतता राखण्यास तयार आहे आणि चीनला इशारा दिला की, तैवानची स्थिती बदलण्यासाठी दबाव किंवा बलप्रयोगाचा वापर करू नये. तैवान आता आपल्या जीडीपीचा 3 टक्के भाग संरक्षणावर खर्च करेल आणि 2030 पर्यंत हा खर्च वाढवून 5 टक्के करण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत हाय-टेक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या साहाय्याने एक स्मार्ट डिफेन्स सिस्टीम तयार केली जाईल, जी असिमेट्रिक स्ट्रॅटेजीला अधिक बळकटी देईल.
दरम्यान तैवानच्या टी-डोम हवाई संरक्षण प्रणालीवर चीनने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी त्याचा निषेध केला आहे. तैवानच्या अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात तथ्ये विकृत केल्याचा आणि तैवानच्या स्वातंत्र्याच्या धोकादायक कल्पनेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे.
संरक्षण तज्ञांच्या मते, इस्रायलचा Iron Dome हा जगातील सर्वांत प्रभावी हवाई संरक्षण यंत्रणांपैकी एक मानला जातो. तो 4 ते 70 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या रॉकेट्स किंवा क्षेपणास्त्रांना इंटरसेप्ट करून हवेतच नष्ट करण्याची क्षमता ठेवतो. त्यातील रडार सिस्टीम incoming मिसाईलची दिशा आणि तिचा संभाव्य परिणाम ओळखते आणि फक्त तीच क्षेपणास्त्रे लक्ष्य करते जी लोकवस्तीच्या दिशेने येत असतात, तर उरलेल्यांना रिकाम्या भागात पडू देते.
नॅशनल पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. हंग माओ टिएन यांनी सांगितले की, त्यांचा देश चीनचा सामना सर्व प्रकारे करण्यास सक्षम आहे. तैवानची अर्थव्यवस्था ८०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे, जी अनेक आफ्रिकन देशांपेक्षा जास्त आहे. तैवानकडे ४०० हून अधिक लढाऊ विमाने, प्रगत क्षेपणास्त्रे आणि मोठी नौदल आहे. त्यांनी सांगितले की, जर चीनने तैवानवर हल्ला केला तर जगाचे भविष्य अंधकारमय होईल, कारण संपूर्ण जागतिक व्यवस्था आपल्या सेमीकंडक्टर उद्योगावर अवलंबून आहे. सेमीकंडक्टर फोनपासून ते क्षेपणास्त्रे आणि कारपर्यंत प्रत्येक गोष्टीत वापरले जातात.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी