रत्नागिरी, 12 ऑक्टोबर, (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील तुळसुंदे, मावळतीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत अज्ञात व्यक्तीने सीसीटीव्ही कॅमेरे तसेच स्वयंपाकघरातील भांडी चोरून नेली. या प्रकरणी संशयित मयूरेश महादेव लाकडे (वय ३२, रा. तुळसुंदे, उगवतीवाडी) याच्याविरोधात नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील शिक्षक युवराज बबनराव देशमुख यांनी दि. ५ ऑक्टोबर रोजी शाळा सुटल्यानंतर वर्गखोल्या कुलूपबंद करून गेले होते. मात्र, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ते शाळेत आले असता शाळेच्या परिसरातील व बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे गायब असल्याचे त्यांनी पाहिले. तसेच शाळेच्या समोरील किचन शेडची कडी-कोयंडा तोडून आतमध्ये ठेवलेले साहित्य चोरीला गेल्याचेही दिसून आले.
सीसीटीव्ही डीव्हीआरतपासून पाहिल्यानंतर आरोपी मयूरेश लाकडे हा शाळेच्या इमारतीत प्रवेश करून किचन रूमची कडी-कोयंडा उचकटून आत शिरला आणि दोन्ही सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अन्य साहित्य चोरीला नेल्याचे उघड झाले. या चोरीत दोन पांढऱ्या रंगाचे सीपी प्लस कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे, सॉकेट केबल, होल्डर असा एकूण ७,१०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या प्रकरणी शिक्षक युवराज देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाटे पोलिसांनी मयूरेश लाकडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी