नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय लष्कर संयुक्त राष्ट्र शांती अभियान सैन्य योगदानकर्ता देशांच्या (यूएनटीसीसी) प्रमुखांच्या परिषदेचे आयोजन येत्या 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत करणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 32 देशांचे वरिष्ठ लष्करी नेतृत्व यानिमित्ताने एकत्र येतील. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सैन्य पाठवणाऱ्या देशांचे शिष्टमंडळ 13 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत येण्याची अपेक्षा आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत परिचालन आव्हाने, भेडसावणारे धोके, आंतरकार्यक्षमता, निर्णयातील सर्वसमावेशकता आणि मोहिमेला बळकटी देण्यामध्ये तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची भूमिका हे मुद्दे हाताळण्यासाठी संयुक्त राष्ट्र शांती अभियान सैन्य योगदानकर्ता देशांचा हा मंच काम करतो. संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेतील सर्वांत मोठा योगदानकर्ता म्हणून भारत, परिचालन आव्हाने, भेडसावणारे धोके, सर्वोत्तम पद्धती सामाईक करणे आणि भविष्यात शांतता राखण्यात एक सामायिक मतैक्य राखण्यासाठी या उच्चस्तरीय परिषदेचे आयोजन करत आहे. ही परिषद वसुधैव कुटुंबकम् (जग एक कुटुंब) हे मूल्य प्रतिबिंबित करते.
या परिषदेदरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह , परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर, शांतता अभियानाचे अवर सचिव (यूएसजी, डीपीओ) जीन पियरे, लॅक्रोइक्स यांची भाषणे होतील. या परिषदेतील पूर्ण सत्रांमध्ये राष्ट्र प्रमुख आणि शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांचे दृष्टीकोन मांडतील. सामाईक क्षमता वृद्धी, द्विपक्षीय आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांसाठी संरक्षण प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येईल. या परिषदेत अल्जेरिया, अर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, भूतान, ब्राझील, बुरूंडी, कंबोडिया, इजिप्त, इथियोपिया, फिजी, फ्रान्स, घाना, इटली, कझाकस्तान, केनिया, किर्गिस्तान, मादागास्कर, मलेशिया, मंगोलिया, मोरोक्को, नेपाळ, नायजेरिया, पोलंड, रवांडा, श्रीलंका, टांझानिया, थायलंड, युगांडा, उरूग्वे आणि व्हिएतनाम या देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील.
हा कार्यक्रम जागतिक शांतता, स्थिरता आणि सामाईक समृद्धी या सर्वांप्रती भारताची अढळ वचनबद्धतेचा दाखला ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule