इस्लामाबाद , 12 ऑक्टोबर (हिं.स.)।अफगान सैन्याने पाकिस्तानवर शनिवारी (11 ऑक्टोबर) रात्री केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे केंद्रीय गृह मंत्री मोहसिन नक्वी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. नक्वी यांनी अफगानिस्तानवर कठोर शब्दांत टीका करताना म्हटले की, हा देश “आग आणि रक्ताचा खेळ” खेळत आहे आणि यामागे भारतासारख्या प्रतिस्पर्धी देशांचा हात असू शकतो, असा आरोपही त्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी अफगान सैन्यांकडून पाकिस्तानच्या सीमावर्ती भागांवर कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनांचा तीव्र निषेध केला. त्यांनी सांगितले की, अफगान सैन्याने नागरी लोकसंख्येवर केलेली कारवाई ही आंतरराष्ट्रीय कायद्यांचे स्पष्ट उल्लंघन आहे. नक्वी म्हणाले की, पाकिस्तानच्या शूर सैन्याने दाखवून दिले आहे की, कोणतीही चिथावणी सहन केली जाणार नाही आणि त्याला त्वरित आणि प्रभावी प्रत्युत्तर दिले जाईल.
ते पुढे म्हणाले, “पाकिस्तानी सैन्य सतर्क आहे आणि अफगानिस्तानला प्रत्येक वीटेला दगडाने उत्तर दिले जात आहे.” अफगानिस्तानलाही तसाच प्रतिसाद दिला जाईल, जसा भारताला देण्यात आला होता, जेणेकरून तो पाकिस्तानकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही. त्यांनी पाकिस्तानच्या जनतेला आश्वस्त केले की, ती आपल्या सशस्त्र सैन्यांसोबत ‘लोखंडाच्या भिंती’सारखी उभी आहे.
दरम्यान, अफगान सैन्याने भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9:23 वाजता पाकिस्तानच्या सीमावर्ती सात वेगवेगळ्या भागांवर एकत्रितपणे हल्ला केला. अफगान अधिकाऱ्यांनुसार, हा हल्ला 210 खालिद बिन वालिद ब्रिगेड आणि 205 अल-बद्र कॉर्प्स यांनी संयुक्तपणे केला. या दरम्यान त्यांनी आर्टिलरी आणि टॅंकसारख्या जड शस्त्रास्त्रांचा वापर केला. अफगान सैन्याचा दावा आहे की या हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि 5 सैनिकांना त्यांनी ताब्यात घेतले. याशिवाय, त्यांनी अनेक शस्त्रे जप्त केली आणि एका मृत पाकिस्तानी सैनिकाचे शव देखील आपल्या छावणीत नेले.
यावर पाकिस्तानी सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंमध्ये झालेली गोळीबारी आणि संघर्ष सुमारे साडेतीन तास चालला आणि तो रात्री 1 वाजता थांबला, जेव्हा अफगान संरक्षण मंत्रालयाने शस्त्रसंधीची घोषणा केली. पाकिस्तानी माध्यमांनी या संघर्षात अफगान चौक्यांचे नुकसान आणि पाकिस्तानी सैनिकांचे मृत्यू व जखमींच्या संदर्भात विविध आकडेवारी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode