नाशिक, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।
: कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपूरचे बालकवी आणि कार्यकर्ते प्रसेनजित गायकवाड यांच्या 'काय तसे मी करू?' या बालकविता संग्रहास नारायण सुर्वे विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. नाशिक मध्ये १५ ऑक्टोबरला होणाऱ्या नारायण सुर्वे साहित्य संमेलनात गायकवाड यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान केला जाईल.
कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या दुस-या सत्रात दुपारी दोनला नारायण सुर्वे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारांचे वितरण होईल. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे प्रमुख पाहुणे असतील. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी असतील. वाचनालयाचे सचिव वादीराज नाईक यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे सकाळी दहाला उदघाटन होईल. डॉ. रावसाहेब कसबे अध्यक्षस्थानी असतील. डॉ. विशाल जाधव हे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाची तयारी अंतीम टप्प्यात पोचली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV