* मुलं हिंसक का होत आहेत?
सध्या मनाचे श्लोक या चित्रपटाच्या नावावरुन वाद सुरु आहे. आपला आजचा लेख हा या चित्रपटाच्या विषयावर आधारित नाही हे आधीच स्पष्ट करतो आणि थेट विषयालाच हात घालतो. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कोल्हापूरमधील हॉस्टेलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहुन अनेकांच्या काळजात चर्रर्रर्र झालं! कारण शाळेतली थोडी मोठी मुलं त्यांच्यापेक्षा लहान मुलांना अमानवी पद्धतीने मारत होती. पट्टा, लाथा-बुक्के, बॅटने गुंडासारखे मारताना त्यांच्या मनात जराही दयामाया नव्हती. ज्या मुलांकडे बघून त्यांचे लाड करावे, त्यांना गोंजारावं अशा वयातली मुलं मवाल्यासारखी मारामारी करुन स्वतःचं गुंडगिरीचं वर्चस्व स्थापन करु पाहतात. हे गंभीर आहे. वाल्मिकी कराडचं प्रकरण ताजं आहे. पण हे गुंड लहानपणीच घडतात. हा व्हिडिओ फेसबुकवर पाहुन पालकांमध्ये भीती आणि समाजात चिंचा निर्माण केली आहे.
हा रॅगिंगचा प्रकार होता असंही म्हटलं गेलं. पोलिसांनी तक्रारही नोंदवून घेतल्याच्या पोस्ट्स फिरल्या. मारणार्या मुलांचं लहान वय पाहता त्यांच्यावर फार मोठी कारवाई होईल असे वाटत नाही. ही केवळ याच हॉस्टेलची गोष्ट नाहीये. शाळा आणि हॉस्टेल्समध्ये हिंसा वाढत चालली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये अहमदाबाद येथील एका शाळेत आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा चाकू मारून खून केला. ही घटना बुलिंगमुळे घडली असल्याचा संशय आहे. पण या घटनेने शाळेतील बुलिंगच्या समस्या पुन्हा एकदा समोर आल्या. मे २०२५ रोजी कर्नाटकमध्ये १३ वर्षीय मुलाने चिप्सच्या वादातून १५ वर्षीय मित्राला चाकू मारून ठार केले. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार, २०२२ मध्ये मुलांनी एकूण ३०,५५५ गुन्हे केले, ज्यात हिंसक गुन्हे जसे की हत्या, बलात्कार आणि चोरीचा समावेश आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीत मुलांनी केलेल्या हिंसक गुन्ह्यांमध्ये २०% ने वाढ झाली आहे, ज्यात मध्य प्रदेश (२०%), महाराष्ट्र (१८%) आणि राजस्थान (९.६%) सारख्या राज्यांचा समावेश आहे. ही गुन्हेगारी वाढण्यामागे कारणे म्हणजे घरगुती ताण, सोशल मीडियाचा अतिरेकी प्रभाव, शालेय दबाव आणि भारतीय मूल्यांचा ऱ्हास इ.
या घटनांमुळे पालक आणि समाजात भीतीचे वातावरण आहे. आपलं मुलंही असं वागणार नाही ना? किंवा आपलं मुलं अशा हिंसक घटनेचा बळी ठरणार नाही ना? ही मोठी चिंता आहे. पूर्वी शाळा हे ज्ञानाचे मंदिर होते आता हिंसेचे मैदान बनत चालले आहे की काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण हा दोष पूर्णपणे शाळेचा नाही किंवा अगदी पालकांचाही नाही. बर्याचदा घरात चार मुलं असतील तर एखादं मुलं प्रचंड हुशार होतं, बाकीची दोन सामान्य आणि एक ढ असू शकतं. एखादा महापुरुष घडला तर आपण त्याच्या आईची स्तुती करतो. पण त्याच आईला इतर मुलांना महापुरुष म्हणून घडवता येत नाही. सांगायचे तात्पर्य सगळं बिल पालकांवर किंवा शाळेवर फाडायची गरज नाही. पण हा दोष अति आधुनिकतेचा आहे, बदलत चाललेल्या जीवनशैलीचा आहे. मात्र त्याचबरोबर आपण आपली भारतीय मूल्ये विसरत चाललो आहोत, हा सर्वात मोठा दोष आहे. सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्स, किंवा घरातील ताण अशा अनेक गोष्टींमुळे मुलांमध्ये आक्रमकता वाढत आहे. आज शाळांमध्ये काऊन्सलर्स असतात. ही गरज का पडली? तर आजार आले तर दवाखान्याची वारी होतेच. पण अत्याधिक आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली मूल्ये विसरलो. अनेक तरुणांना ह्रदयविकाराचा झटका आलेला पाहुन आपल्याला आश्चर्य वाटतं. अरे तो तर निर्व्यसनी होता! मग असा कसा गेला? हा प्रश्न आपल्याला पडतो. कारण लाईफस्टाईल! व्यसन जरी करत नसला तरी त्याची जीवनशैली आजारास निमंत्रण देणारी होती. काहीही खाणं, कधीही झोपण, उठणं, तासंतास मोबाईलवर स्क्रोल करत बसणं अशा गोष्टींमुळे निर्व्यसनी माणूसही आजारी पडतो. त्याचप्रकारे आपली जीवनशैली बदलल्यामुळे आपल्या मनावर देखील परिणाम होऊ लागला आहे. अगदी २५ वर्षे मागे डोकावून पाहिले तरी असे लक्षात येईल की आपल्या आहारात जसा औषधी मूल्यांचा वापर व्हायचा तसा आपल्या मानसिक जीवनातही अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा वापर व्हायचा. दिवे लागणीच्या वेळी आपण घरी असायचो. शुभंकरोती म्हणायचो. विविध श्लोक म्हणायचो. पूर्वी अनेक मुलांना मनाचे श्लोक म्हणणे जवळजवळ कंपल्सरी होतं. वरवर पाहता समर्थ रामदासांनी हे श्लोक स्वतःच्या मनाला उपदेश करण्यासाठी लिहिले असे वाटत असले तरी, त्यांचा उद्देश समाजाला मार्गदर्शन करणे हा होता. समर्थ हे 'समर्थ' होते. त्यांचे मन त्यांच्या ताब्यातच होते. पण त्यांनी इतरांच्या मनाच्या विकृतींवर नियंत्रण मिळवण्याचे सूत्र दिले. बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय मन हे उन्मत्त बैलासारखे असते. एकवेळ उन्मत्त बैल ताब्यात येईल, जागतिक गुंड अटकेत येईल, पण मनावर ताबा मिळवणे हे सर्वांत कठीण. म्हणूनच समर्थांनी श्लोकांतून मनाला शिस्त लावण्याचे रहस्य सांगितले.
आज काही महामूर्ख लोक समर्थ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावर टिका करतात. मात्र या मूल्यांनी मनावर संस्कार केले. कुटुंब सावरली. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अध्यात्मिक संस्थेने कितीतरी कुटुंबांना आधार दिला आहे. आजही अनेक ठिकाणी कौटुंबिक रचना मजबूत दिसते ती या अध्यात्मिक गुरुंमुळे आणि त्यांच्या सामाजिक कार्यामुळे. म्हणूनच देशविघातक शक्ती या मनावर संस्कार करणार्या घटकावर हल्ला करतात. आज 'मॉडर्नायझेशन'च्या नावाखाली चांगल्या संस्कृतीवर टीका होत आहे. लग्नसंस्थेसारख्या परंपरा हद्दपार करण्याचा बेत आखला जात आहे. सण फक्त शॉपिंग आणि पार्टीपर्यंत मर्यादित होत आहेत. याचा थेट परिणाम मुलांवर होत आहे. मन कसं असतं? आपल्याला सुविचार शिकवावा लागतो पण शिव्या शिकवाव्या लागत नाहीत. कोणत्याही वाईट गोष्टीचं आकर्षण मनाला लवकर पडतं. आज भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. आजचे तरुण उद्या म्हातारे होतील आणि आजची लहान मुले उद्या तरुण होणार आहेत. त्यामुळे आताच काळजी घ्यावी लागणार आहे. पुढे पालकांना शोक व्यक्त करावा लागू नये म्हणून पुन्हा एकदा मनाचे श्लोक ही जीवनशैली बनवावी लागणार आहे. मनाचे श्लोक हे केवळ मनाला केलेले उपदेश नसून ते जीवनाचे सूत्र आहे. शाळांमध्ये, घराघरात, समाजात ही मनाचे श्लोक ही चळवळ पुन्हा सुरू करावी लागणार आहे. मी एका शाळेत वक्तृत्व स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून गेल होतो. तर तिथल्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की त्यांनी शाळेत हरिपाठ म्हणणं अनिवार्य केलं. त्यानंतर मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला. आपल्या संस्कृतीत संस्काराची सहजता आहे. म्हणूनच या अत्याधुनिक जगात आपल्याला संस्कृतीपासून दूर नव्हे तर थोडे अधिक जवळ जाण्याची गरज आहे. सरकारने शालेय हिंसेसाठी कडक कायदे राबवले पाहिजेच. तसेच पालकांनी मुलांना मनाच्या श्लोकाकडे वळवले पहिजे, शाळांनी नैतिक शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. समाजात चांगले-वाईट असणारच. राम असतानाही रावण होता. पण रावणांची संख्या मर्यादित होईल एवढं निश्चित. आज law of attraction किंवा positive affirmations बद्दल किती चर्चा होतेय. त्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करत आहेत. पण हे positive affirmations समर्थ रामदासांनी आपल्याला फुकटात दिलंय. फार फार तर ४०-५० रुपयाचं मनाच्या श्लोकाचं पुस्तक खरेदी केलं तर अनेक पिढ्यांना positive affirmations मिळत राहिल. मग वेळ कशाला घालवायचा?
समर्थ म्हणतात -
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥
जय जय रघुवीर समर्थ!
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
writerjayeshmestry@gmail.com
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी