अकोला, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।अकोल्याच्या पातूर येथे जुने बसस्थानक परिसरात आज पहाटे दीड वाजता तिन जणांनी एका युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून पातूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय भिमराव उमाळे हा आपल्या जावयासोबत शंकर पाटील यांच्यासह बसस्थानकाजवळ बिस्कीट घ्यायला आला होता. त्यावेळी शिवम उर्फ शिवा निलखन आणि योगेश महादेव तायडे यांनी त्यांची गाडीची चावी हिसकावून अक्षयला मारहाण केली. मधे पडलेल्या शंकर पाटील यांनाही ढकलण्यात आलं.
यादरम्यान, शंकर पाटील यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. तोवर शिवा निलखन याने मोबाईलवरून साथीदार आकाश गजानन राऊतला बोलावून घेतलं. तिघांनी मिळून अक्षय उमाळे याचे अपहरण करून नानासाहेब वेटाळ येथे नेऊन काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शिवाय, पोलिसांत तक्रार केली तर जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान शंकर पाटील पोलिसांना घेऊन घटनास्थळी पोहोचले असता, आरोपींनी पोलिसांनाही धमकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पातूर पोलिसांनी शिवा निलखनला पकडून तिन्ही आरोपींवर भादवी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार पोलीस उपनिरीक्षक रमेश खंडारे करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे